एका मोहात सर्व काही गमावले -वाचा सविस्तर-

0
589

एका मोहात सर्व काही गमावले

  • डॉ. दिनेश थिटे

स्वाभिमानी आमदार राजू शेट्टी यांनी २००७ साली ‘सासूची वरात सुनेच्या दारात’, या मराठी चित्रपटात अभिनय केला होता. त्यावेळी त्यांना कल्पनेतही वाटले नसेल की, तेरा वर्षांनी आपलीच वरात शरद पवारांच्या दारात आमदारकीसाठी उभी असेल. इचलकरंजीच्या शुभंकरोती चित्र या संस्थेने निर्मिती केलेल्या या चित्रपटात सगळेच हौशी कलाकार होते. त्यांच्यापैकी एक आमदार राजू शेट्टी होते. तो काळ राजू शेट्टींचा होता.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत राजू शेट्टींची जडणघडण झाली. जोशींकडून शेतीचे अर्थशास्त्र शिकून घेतले. मग त्यांच्या संघटनेतून बाहेर पडून राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन केली. सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटील अशा सहकाऱ्यांच्या साथीने राजू शेट्टींच्या संघटनेने पश्चिम महाराष्ट्र आंदोलनांनी हादरून सोडला. ऊस आणि दूध याच्या योग्य दरासाठी केलेल्या अत्यंत आक्रमक आंदोलनांमुळे या संघटनेला आणि राजू शेट्टींना महत्व आले. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस – सहकार लॉबी असे अनेक पदरी राजकीय वर्चस्व आहे. सर्व काही त्यांच्या दबावाखाली, अशी स्थिती आहे. तेथे या प्रस्थापितांविरुद्ध लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करणे सोपे नव्हते. पण ती हिंमत राजू शेट्टींनी केली. त्यातून त्यांना शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा पाठिंबा मिळत गेला.

प्रस्थापितांविरुद्ध लढणारा शेतकरी नेता या प्रतिमेच्या जोरावर २००४ साली राजू शेट्टी शिरोळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय घराण्यांच्या वर्चस्वाला आव्हान देणारा ३७ वर्षांचा तरूण तडफदार आमदार म्हणून त्यांनी लक्ष वेधून घेतले. पश्चिम महाराष्ट्रात प्रस्थापितांनी केलेल्या शोषणाला आणि दादागिरीला आव्हान देणाऱ्या तरुणांनी झटून काम केले आणि राजू शेट्टी निवडून आले. २००९ साली ते हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेसाठी निवडून गेले. साखर पट्ट्यात प्रस्थापितांविरुद्ध लढून सलग दोन निवडणुका जिंकण्याचे कर्तृत्व त्यांनी केले.

२०१४ साली राजू शेट्टी यांनी बारामतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन केले आणि त्यांनी आपल्या प्रस्थापितविरोधी लढ्यातील शिखर गाठले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार देशाचे कृषीमंत्री होते. त्यांचे पुतणे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते. केंद्रात व राज्यात दोन्हीकडे शरद पवारांची सत्ता होती. शरद पवारांच्याच शहरात त्यांच्याविरोधात आंदोलन करून त्यांना आव्हान देणे सोपे नव्हते. पण राजू शेट्टींनी ते करून दाखविले. त्याच वातावरणात २०१४ साली ते पुन्हा एकदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.

संघर्ष हेच राजू शेट्टी यांचे जीवन बनले होते. सततच्या आंदोलनांमुळे त्यांच्याविरोधात शिरोली, कराड, फलटण, मालेगाव, भुईंज, इंदापूर, हातकणंगले, जयसिंगपूर, बारामती अशा विविध ठिकाणी पंधरा गुन्हे दाखल झाले आहेत. राजू शेट्टी कोणत्याही प्रस्थापिताला आव्हान देऊ शकतात, अगदी शरद पवारांनाही ते आव्हान देऊ शकतात, अशी त्यांची प्रतिमा झाली. त्यामुळेच त्यांना जबरदस्त पाठबळ मिळाले. त्यातून त्यांना त्यांच्यासोबत जीव धोक्यात घालून लढणारे सोबती मिळाले. पण राजू शेट्टींना धडाडीचे कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत. रघुनाथ पाटील त्यांच्यापासून दुरावले. उल्हास पाटील त्यांना सोडून दूर गेले. सदाभाऊंनाही त्यांनी असेच दूर घालवले.

२०१४ साली राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर महायुतीतील घटकपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेत वाटा देण्यात आला. राजू शेट्टींनी संघटनेतर्फे आमदारकी आणि मंत्रिपदासाठी सदाभाऊ खोत यांचे नाव सुचविले. सदाभाऊ मंत्री झाले, कार्यकर्त्यांचा त्यांच्याकडे विविध कामांसाठी राबता सुरू झाला आणि राजू शेट्टी अस्वस्थ झाले. केवळ मी म्हणजेच संघटना, इतरांनी सदैव आपल्या दबावाखाली राहिले पाहिजे अशा थाटात ते वागत गेले. मी कोणालाही मोठा करू शकतो. एखाद्याला मंत्रीही करू शकतो, असे त्यांना दाखवून द्यायचे होते. पण संघटना मोठी होताना संघटनेतील सहकाऱ्यांनाही मोठे होऊ द्यायचे असते हे मूळ सूत्र ते विसरले. त्यातून कटकटी सुरू झाल्या आणि सदाभाऊही दुखावले. आंदोलनात आपल्यासोबत लाठ्या काठ्या खाणारा सदाभाऊंसारखा धडाडीचा नेता राजू शेट्टींनी संघटनेतून बाहेर काढला.

राजू शेट्टी यांच्या संघटनेतील माणसे त्यांना सोडून गेली तरी त्यांचा राजकीय प्रभाव काही प्रमाणात टिकून राहिला. कोणालाही आव्हान देऊ शकणारा एक लढाऊ नेता या त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांचे महत्त्व टिकले. पण शरद पवारांच्या दारात जाऊन त्यांच्याकडून विधान परिषदेच्या आमदारकीचा प्रस्ताव स्वीकारून राजू शेट्टी यांनी आपली प्रतिमा धुळीला मिळवली. शरद पवार हे राज्यातील प्रस्थापित सहकार – साखर – शिक्षण संस्था – राजकीय सत्ता या लॉबीचे नेते आहेत. पवारांकडून आमदारकी स्वीकारताना आपण त्यांना आपली प्रस्थापितविरोधी नेता ही प्रतिमा, आतापर्यंतचा शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा आणि एकूणच राजकीय भांडवल अर्पण करत आहोत, याचे भान शेट्टी यांना सुटले की, काय असे वाटण्यासारखी परिस्थिती आहे.

राजू शेट्टी यांनी बारातमतीत जाऊन पवारांकडून आमदारकी स्वीकारावी याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यांच्या जवळचे आणि त्यांना दुरून पाहणारे सर्वांनाच त्यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक वाटे. त्यांनी अशा प्रकारे तह करणे लोकांना पटले नाही. एकूण रागरंग पाहून त्यांनी माघार घेतली. आमदारकी स्वीकारण्याच्या निर्णयानंतर दोनच दिवसांनी गुरुवारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, “समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच…”

आपल्या आमदारकीवरून पक्षात वाद नको म्हणून आपण माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले तरी ते राजू शेट्टी यांना उशीरा सुचलेले शहाणपण आहे. ‘आम्ही रक्त सांडून ही चळवळ ऊभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही,’ असे ते आता म्हणतात तर ज्यांच्याशी पंचवीस वर्षे लढून ही चळवळ उभी केली त्यांच्याच दारात आपण का गेलो, याचे उत्तर त्यांना आता द्यावे लागेल.

प्रस्थापितांविरोधात लढणाऱ्यांना आपली विश्वासार्हता अधिक जपावी लागते. केवळ आपल्या संघटनेतच नाही तर समाजातील आपली प्रतिमाही जपावी लागते. राजू शेट्टी यांनी दीर्घकाळ केलेल्या संघर्षामुळे कोणालाही आव्हान देऊ शकणारा एक लढाऊ नेता अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली होती. एका आमदारकीच्या मोहात त्यांनी आपली पुण्याई धुळीला मिळवली. आमदारकी न देताच शरद पवारांचे राजकारण यशस्वी झाले.

( लेखक राजकारणाचे अभ्यासक आहेत.)

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here