ग्लोबल न्यूज- पुणे सीमा शुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल एक कोटीचा गांजा आणि 75 लाखांचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन वाहनेही जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या चौघांकडे एक कोटी किंमतीचे 868 किलो गांजा आणि 75 लाख रुपयांचे 7.5 किलो चरस आढळून आले.
आंध्र प्रदेशातील काही दुर्गम ठिकाणांमधून महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणांसाठी अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्या ट्रकविषयी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पुणे सीमाशुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नळदुर्ग-सोलापूर रोडवर सोलापूरच्या बोरामणी गावाजवळ काल (बुधवारी) दुपारी साडेचार वाजल्यापासून पाळत ठेवली होती.


बोरामणी-नळदुर्ग रोडवर ट्रक शोधताना सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने वाहनांचा पाठलाग केला आणि अखेर पुण्यातच त्याला अडवले. या वाहनांच्या कडक झडतीनंतर असे लक्षात आले की वाहनाच्या छतावर तयार केलेल्या पोकळीत गांजा लपविला गेला होता आणि अंदाजे 1.04 कोटी रुपये किंमतीचे 868 किलोग्रॅम गांजा सापडला.
दोन वाहनांपैकी दुसऱ्या गाडीतून 7.5 किलोग्रॅम चरस हा दुसऱ्या प्रकारचा अंमली पदार्थ जप्त केला. दोन्ही वाहनांचे चालक व क्लिनर अशा एकूण चारजणांना सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले आले. ते सर्व सुमारे 30 ते 35 वयोगटातील असून ते महाराष्ट्रातील आहेत. जप्तीची एकूण किंमत रु 2 कोटी 10 लाख रुपये आहे. पुढील तपास प्रगतीपथावर आहे, अशी माहिती पुणे सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांनी दिली.
