दिनांक : १९ऑगस्ट; शुक्रवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
आपण कोण आहोत? हे अगोदर आपल्याला कळले पाहिजे-जयवंत बोधले महाराज
बार्शी: भगवंताच्या दिव्य अधिष्ठानापुढे चालू असलेले संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन, २२व्या दिवशी श्रोत्यांनी गोपाळकाल्याच्या अतिशय प्रसन्न अशा वातावरणात श्रवण केले. संत तुकाराम महाराजांचे चरित्र चिंतन एका विशिष्ट टप्प्यांवर आलेले असताना गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज साधनेतील सूक्ष्मता स्पष्ट करतात. या संबंधाने ते एक मौलिक विचार नमूद करतात. आपण कोण आहोत? हे अगोदर आपल्याला कळले पाहिजे. त्यासाठी आपणाला पूर्वानुभव घ्यावा लागतो. अनुभवाशिवाय आपण दूस-याला उपदेश करु शकत नाही. किंबहुना,अनुभवातूनच आपल्याला अनुवाद करता येतो.

संत तुकाराम महाराज सांगतात- आपुलासी वाद आपणाशी। अगोदर आपल्या मनाशी संवाद करुन अनुभव घ्यावा; तरच ते ज्ञान लोकांना सांगण्यासाठी आपण अधिकारी आहोत. हा अधिकार प्राप्त होण्यासाठी एकांताची मूलभूत गरज आहे. या एकांतासाठी मला डोंगरावर जाणेच योग्य आहे. कारण, मला असा एकांत इतरत्र मिळणे शक्य नाही. म्हणून,पुढे तुकाराम महाराज बोलतात – आम्हा एकांताचा वास।

या लौकिकात वावरणाऱ्या लोकांची क्षणभरही संगत मला आता नको. ती संगत दु:ख निर्मीती करत आहे. असंग अर्थात एकांत परमात्म्याजवळ घेऊन जाणारा आहे. तमोगुण व रजोगुण त्रासदायक आहेतच. परंतु, सत्वगुणातूनही कधी कधी दु:ख होण्याचा संभव असतो. या लोकांच्या प्रपंच्यातील गोष्टी ऐकून माझे मन शीण होते. म्हणून, मला असंग प्रिय वाटतो. गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज हे तात्विक चिंतन अनेक दृष्टांतात पटवून देतात.
पुढे ते बोलतात की, प्रापंचिक जीवनापेक्षा पारमार्थिक जीवनातच अधिक संकटे येतात. येनकेन रुपाने ती संकटे वा प्रलोभने आपल्याला त्या साध्या पासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करु पाहतात. म्हणून, साधनेमध्ये अखंड सावध राहावे लागते. संत तुकाराम महाराज क्षणोक्षणी सावध अवस्थेत राहून ;कोणी निंदा करावी, कोणी स्तुती करावी त्याचा स्पर्श मनाला होऊ देत नाहीत.
एके दिवशी जिजाई तुकाराम महाराजांना सांगतात की, माझा भाऊ येणार आहे. तेव्हा, तुम्ही आज डोंगरावर न जाता घरीच थांबावे. हे आग्रहाचे बोलणे ऐकून तुकाराम महाराज घरीच थांबतात. जिजाई आनंदाने भोजनाची तयारी करतात. जिजाईंचा भाऊ व तुकाराम महाराज दोघे जेवत होते. तुकाराम महाराजांचा रामकृष्णहरि नामजप जेवताना ही चालूच होता. जेवणात मीठ कमी असल्याने ते फारसे रुचकर वाटेना. त्यामुळे, जिजाईंच्या बंधूंनी अर्धपोटीच जेवण केले. हे आळणी जेवण आहे , असे लक्षात येताच जिजाईंनी तुकाराम महाराजांना सुनावणी सुरु केली. तुमच्यामुळे माझा भाऊ अर्धपोटी उठला. तुम्ही मला सांगितले नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात- अगं आवले,मला जाणवलेच नाही की, भाजीत मीठ कमी आहे. तर मी कसे सांगणार…! नामस्मरणाचा हा परिणाम….!!