‘मोकळं आभाळ’ पती-पत्नी मधील संवाद कसा असावा..!

0
1301

‘मोकळं आभाळ’ पती-पत्नी मधील संवाद कसा असावा..!

आज पुन्हा अक्षयने डबा मिटून ठेवला होता… पहिलाच घास खाल्ल्यावर… भाजीत मीठच नव्हतं, कणभरही. आजचा सलग दुसरा दिवस होता अक्षयचा, असा डबा जवळजवळ तसाच ठेऊन… घरी घेऊन जाण्याचा. काल प्रचंड चिडचिड झाली होती त्याची…”स्साला, ज्या पोटासाठी कमावतो, तेच जर भरणार नसेल… आणि ते ही कोणाच्या गलथानपणामुळे… तर काय अर्थ आहे याला”… असा विचार येऊन बिथरला होता तो… पण कामाच्या धबडग्यात नंतर, तो विचार मागे पडला. काल कोणा क्लाएंटबरोबर पार्टी होती… त्यामुळे तो रात्री घरी ऊशिरा पोहोचला… तेव्हा अनुया नी मुलं झोपली होती… सकाळी ऊठल्यावर पुन्हा आॅफिसला निघण्याची धावपळ… या सगळ्यात त्या अळणी भाजीबद्दल विचारायचच राहून गेलं होतं.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

“कालचा डबा आपण पिशवीत भरुन ब्रीजवर बसलेल्या एका भिकार्‍याला दिला होता… त्यामुळे अनुयाला कळलंच नसावं की आपण दुपारी जेवलो नाहिये… आज सगळा डबा तस्साच परत नेऊया… बोलू तर दे मग अनुया काही”… विचार पक्का झाला होता अक्षयचा… ऊरला दिवस पुन्हा टेबलावरचं काम अन् घड्याळाचे काटे, ह्यांची सांगड बसवण्यात गेला. रात्री घरी पोहोचल्यावर मुलं अभ्यास करत होती… आणि अनुया स्वैपाक.

अक्षयने टिफिनबाॅक्स ओट्यावर ठेवला, वाट बघत की कधी अनुया आपल्याला विचारतीये… नी कधी तिला सुनावतोय आपण ह्याची. अनुयाने सगळं कचर्‍याच्या पिशवीत टाकून देऊन, डबे घासायला टाकले… एका शब्दानेही अक्षयला काहिही न विचारता ती, पुन्हा तीच्या कामाला लागलेली. “काय माज चाललाय हीचा… अख्खा डबा परत आणलाय नवर्‍याने, हे कळूनही एका शब्दाने काही विचारणं नाही… झाले असुदेत आमच्यातले संवाद आताशा कमी…

पण एवढा अलुफनेस यावा लग्नाच्या बाराव्या वर्षीच… काही फिकिरच नसावी नवर्‍याची… धिस ईज टू मच”… विचारांनी शीर तडतडू लागली अक्षयची. मोठा छोकरा तेवढ्यात निरोप घेऊन आला… “पानं वाढलियेत… आई विचारतेय हाॅल मध्ये बसणार की बेडरुम मध्ये”. अक्षयने हाॅलमध्येच ताट मागवलं… मग दोन्ही मुलंही त्याच्याबरोबरच हाॅलमध्ये बसली… अनुया न जेवताच बेडरुममध्ये जाऊन झोपलेली कळूनही, अक्षयला तिची चौकशी कराविशी वाटली नाही… ना थेट, ना मुलांकडे.

“कायपण दळभद्री आयुष्य आहे स्सालं… ईन मीन तीन खोल्यांतून चारजणं राहतोय… त्यातले दोन तर वयाने दहा वर्षांआतले… दोन मोठे… पण फक्त वयाने… नाहितर समजुतीत त्या दोन्ही मुलांएवढेच… लाईफ हॅज बिकम मिझरेबल”. ह्या विचारांतच जेवण आटोपलं अक्षयचं. एकाही पदार्थाची चव मागे जिभेवर रेंगाळलेली नव्हती… किंबहूना चुळ भरतांनाही अक्षयला प्रयत्न करुनही ना भाजीची चव आठवत होती… ना आमटीची. थोडक्यात निव्वळ औपचारीकता म्हणून स्वैपाक करण्यात आलेला, हे कळलं होतं अक्षयला.

अनुयाचं काहितरी बिनसलय नक्की, असं अक्षयला राहून राहून वाटत होतं… पण नक्की काय?… हे त्याला कळत नव्हतं. मुलांनी बॅग लावणं,रात्रीचे कपडे घालणं, ब्रश करणं वैगरे कामं आपापली केली… आई लवकर झोपलिये तर तिला डिस्टर्ब केलं नाही त्यांनी… पण एकाही कामासाठी त्यांना बाबाची गरजही लागली नव्हती. अक्षयने स्वतःचं आवरलं… नी तो पलंगावर आडवा झाला… अनुयाने तो आल्याचं कळून, नेहमीप्रमाणेच कूस बदलली…

पाठ करुन झोपली ती अक्षयकडे… हे एकमेकांकडे पाठ करुन झोपण्याची फेज, अंमळ लवकरच आली होती दोघांच्या आयुष्यात. अक्षयने पाठमोर्‍या अनुयाकडे तोंड केलं… “ती पाठमोरी आहे… तिला काय कळणार, की आपण तिच्याकडे तोंड करुन झोपलोय… तिच्या पाठमोर्‍या चढ – ऊतारांकडे बघत”… झोपायच्या अंथरुणावरही ‘ईगो’ अगदी टक्क डोळ्यांनी जागा होता. तेवढ्यात अक्षयचा हात अनुयाने घेतलेल्या ऊशीवर पडला…

आणि चपापला तो… त्याने त्या अंधारात पुन्हा पुन्हा चाचपडून पाहिली ऊशी… अभ्रा भिजला होता ऊशीचा बर्‍यापैकी… “आपण यायच्याआधी ईथे तोंड करुन झोपलेली अनुया… व्यवस्थित रडली होती म्हणजे… काय नेमकं चाल्लय मनात तिच्या?… कसली चलबिचल चालू आहे?… काय लपवतीये ती आपल्यापासून?… नेमकं काय सहन करावं लागतय तीला एकट्यानेच?”. असंख्य प्रश्नांनी थैमान घातलं होतं मनात अक्षयच्या… गेले दोन दिवस ऊपाशी रहावं लागल्याचा राग कुठल्याकूठे पळून गेला होता…

आता त्या अंधारातही ठळकपणे दिसत होती त्याला काळजी… अनुयाबद्दल वाटणारी. तो ऊठला… मोबाईलच्या ऊजेडात त्याने चाहूल घेतली मुलांची… ती झोपली होती गाढ, खाली घातलेल्या गाद्यांवर. “अशी मुलं झोपण्याची वाट बघत… ती झोपल्याची खात्री करुन घेण्यालाही… कीतीतरी महिने ऊलटून गेले नै”… एक खिन्न विचार तेवढ्यातल्या तेवढ्यात, डोकाऊन गेला त्याच्या मनातून. कसलासा ठाम विचार करत अक्षय ऊठला… अनुयाच्या खांद्याला हलवत त्याने तीला दबक्या आवाजातच बाहेर यायला सांगितलं.

हाॅलमध्ये येऊन अक्षयने दिवा लावला… अनुया ही आलिच पाठोपाठ… तीचे डोळे रडून सुजल्यासारखे वाटले त्याला… अक्षयला खूप वाईट वाटलं तिच्याकडे बघून… विचार आला त्याच्या डोक्यात की… “एका छताखाली राहुनही, आपण साधं बघतही नाही एकमेकांकडे मनापासून”. त्याला त्याच्या नी त्याच्या आईमधला एक संवाद आठवला… जेव्हा एकेदिवशी त्याने आईला विचारलं होतं, की “बाबांच्या गोळ्यांचं शेड्युल तू ईतकं व्यवस्थित कसं काय सांभाळू शकतेस?…

आई म्हणाली होती… “रोज रात्री मी दहा मिनिटं तरी निदान, तुझ्या झोपलेल्या बाबांच्या चेहर्‍याकडे मन लाऊन बघते… तो रात्रीचा, फळा पुसल्यासारखा चेहराच खरा चेहरा असतो… एकदा का दिवस ऊजाडला… की मनातुन झालेली अनेकानेक विचारांची दाटी, चेहर्‍यावर ऊमटते… नी आपण लांब जातो त्या चेहर्‍यापासून, ते त्यावर ऊमटलेले भाव न आवडून… पण तोच चेहरा रात्री आपल्याला खेचून घेतो त्याच्याकडे… आणि मग खरंच मनापासून वाटतं, की ह्या चेहर्‍यावरची प्रत्येक रेष अन् रेष… आपल्यालाच जपायचीये…

येतं मग बळ आपोआप, त्या चेहर्‍याच्या शरिरासाठीही झटण्याचं”. “पण आई हे असं एकतर्फी असून चालतं?… विचार नाही येत कधी, की समोरच्यालाच पडलेली नाही तर आपण तरी का एवढं तडफडा?”… अक्षयने विचारलं होतं आईला. आई म्हणाली होती… “कोणी सांगावं झोपलेल्या माझ्याकडे टक लाऊन बघण्याची, तुझ्या बाबांची दहा मिनिटं मध्यरात्री येत असतील… आणि कदाचित त्यांची पद्धत अजुन वेगळी असू शकतेच की, मला… तुझ्या आईला स्वतःच्या मनातून तेवत ठेवण्याची… आपण मुळात समोरच्याचा विचार करावाच का?… आपण आपल्याशी प्रामाणिक रहायचं… बस्स… पन्नास वर्षांचा संसार एकमेकांशी तर नाहीच, पण स्वतःशीही अप्रामाणिक राहून होत नसतो रे बाळा”.

झर्रकन तो अख्खा प्रसंग अक्षयच्या डोळ्यांसमोरुन सरकला… तो पुढे झाला… गोंधळलेल्या अनुयाच्या जवळ गेला… आणि काहिही न बोलता त्याने मिठीत घेतलं तीला. अनुयाचा बांध फुटला… अक्षयचा ऊजवा खांदा भिजू लागला… त्यानेही तो भिजू दिला व्यवस्थित. अक्षयच्या मिठीनेच अनुयाला त्याचा प्रश्न विचारला होता… त्यामुळे त्याने काही थेट विचारण्याआधीच, तीने सांगायला सुरुवात केली होती.

“दोन महिन्यांपुर्वी ‘तो’ आयुष्यात आला माझ्या… अचानक आलेली फ्रेन्ड रिक्वेस्ट कोणा अनोळखी व्यक्तीची, मी कशी काय स्विकारली कोण जाणे… पण नंतर एकमेकांच्या पोस्ट्सना लाईक्स, कमेन्ट्स देण्याने झालेली सुरवात… कधी मेसेंजर वर चौकशी करण्यापर्यत आली कळलच नाही… मग व्हाॅट्सअॅप नंबर्स शेअर झाले… तिथे गप्पा चालू झाल्या… त्याचा बोलका स्वभाव, गंमतीशीर बोलणं, काळजीचा सूर… आमचे बरेच काॅमन छंद… खूप खूप आवडत होतं मला ते… दोन महिने हे चालू होतं सगळं… आणि चार दिवसांपुर्वी त्याचा मेसेज आला मला… की मी मुंबईत आहे

आठवड्याभराकरता… भेटशील का?… सोळावं लागलेल्या मुलीसारखी, मी हुरळून गेले होते… काय बोलुया काय नको, ह्याची ऊजळणी करत होते… त्याच्यासाठी त्याला आवडतात म्हणून, गुलाबजाम केले होते मी… आणि गेले भेटायला त्याला, तो ऊतरलेल्या हाॅटेलच्या रुमवर… खूप आनंद झाला मला त्याला पहिल्यांदा बघून… पण… पण त्याने मला केलेल्या त्या पहिल्याच ‘हग’ मध्ये, मला काहितरी विचित्र अशी भुक जाणवली… तो सोडतच नव्हता मला… मी त्याला कसाबसा दुर लोटला… त्याला काही सांगू पहात होते मी… पण त्याला माझं काही ऐकण्यात, ईंटरेस्टच नव्हता…

त्याचं आपलं सुरुच होतं माझ्या अंगचटीला येणं… वाटलं… हाऊ समवन डेअर्स टू टच मी विदाऊट माय पर्मिशन?… शिरशीरी आली मला… बेसिकली मला ह्या गेल्या दोन महिन्यांपासून, जो ‘पुरुष’ माझा छान मित्र वाटत होता… त्याला मी मात्र फक्त नी फक्त, एक ‘बाई’च वाटत होते… त्याला मैत्रिणीची गरजच नव्हती मुळी… त्याला हवी होती एक स्री… गप्पा मारतांना साधारण अंदाज आलेली… संसारात नाखूष असलेली… नवर्‍यापासून डिटॅच्ड झालेली… फक्त मुलांसाठी जगणारी… थोडक्यात ‘अ मटेरिअल दॅट कॅन बी ईझीली अव्हेलेबल’ होते मी त्याच्यासाठी… किळस आली मला त्याची… तडक निघाले मी तिथून…

गुलाबजाम दीले रस्त्यातल्या एका भिकार्‍याला… त्या भिकार्‍यापेक्षाही लाचार नी भुकेला वाटला होता मला तो… मग बेचैनच होते मी गेले चार दिवस… कुढत होते आतल्याआत… ईग्नोर करत होते त्याचे सततचे मेसेजेस… त्याचे काॅल्स… तुला काय सांगणार होते मी?… जर तू असुनही नसल्यासारखा असतोस घरी… कायम फक्त स्वतःच्यात… एकटी होते मी… आधार हवा होता मला… पण मी फसले… तिथेही”.

अक्षयने अनुयाचा हात त्याच्या हातात घट्ट धरला… तिच्या डोळ्यांत बघत… स्वतःच्या डोळ्यांतुन विश्वासार्हता दाखवत, त्याने तिला दिलासा दिला, मुकपणेच… की ती फसली नाहिये ‘ईथे’. ऊरलेली रात्र दोघांनीही बसूनच काढली मग… त्याच्या छातीवर डोकं टेकून तिने… नी तीचं डोकं थोपटत त्याने.

दुसर्‍या दिवशी सकाळी कोपर्‍यावरच्या ऊडप्याच्या हाॅटेलात मस्त आवडीचा रवा मसाला डोसा खाऊन, एक कडक फिल्टर काॅफी पित होती अनुया… आणि अक्षय बघत होता तिच्याकडे, टक लाऊन प्रसन्न हसत. अनुयाने शेवटचा घोट घेत कप खाली ठेवला… नी ती टेकली पाठी खुर्चीला रिलॅक्स होऊन, टेबलावर बोटांनी वाजवत… अक्षयकडे बघत. कौतुक आणि प्रेन दाटून आलं होतं, डोळ्यांतून तिच्या अक्षयबद्दलचं… कारण?

कारण ह्या हाॅटेलमध्ये येण्यापुर्वी, अक्षय तिला ‘त्या’ हाॅटेलमध्ये घेऊन गेला होता… जिकडे ‘तो’ ऊतरला होता. “अशा माणसापासून नुसती आपली सुटका करुन घेऊन, गप्प बसायचं नसतं अगं… पुन्हा असं कोणाबरोबर करण्याआधी, ‘तो’ दहावेळा विचार करेल… हे ही बघायचं असतं”…. अक्षयने हे सांगत अनुयाला ‘त्या’च्या रुमवर नेलं होतं. अक्षय हाताची घडी घालून शांत ऊभा होता मग… जेव्हा अनुया अंगात होता नव्हता तेवढा जोर काढून, ‘त्या’च्या मुस्काटात ठेऊन देत होती… तिच्यातल्या बाईला गृहित धरणार्‍या, त्याच्यातल्या पुरुषाची नांगी… ठेचून काढत होती.

छान हसली अनुया अक्षयकडे बघत… पोटभर खाल्ल होतं आज तीने, बर्‍याच दिवसांनी. मोकळं झालं होत आभाळ, आज बर्‍याच महिन्यांनी… त्याच्या स्वतःच्या, हक्काच्या, एकुलत्याएक सुर्यासाठी.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here