दिनांक : २३ऑगस्ट;मंगळवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
सद्गुरुंच्या अनुग्रहाचा माझ्यावर काय परिणाम झाला, हे परमार्थाला जास्त अपेक्षित आहे-जयवंत बोधले महाराज
बार्शी: संत तुकाराम महाराजांना सद्गुरुंची कृपा झाली. सद्गुरुंकडून अनुग्रह मिळाला. हा अनुग्रह घेतला त्यामुळे, त्याचा परिणाम काय? माझ्या जवळील सर्व अवगुण निघून गेले. असे विवेचन जयवंत बोधले महाराज यांनी केले.

गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले प्रवचनमालेच्या २६ व्या दिवशी सद्गुरुकृपेच्या परिणामाचा तात्विक उलघडा करताना स्पष्ट सांगतात की, माझ्यावर अनुग्रह झाला यापेक्षाही त्या अनुग्रहाचा माझ्यावर काय परिणाम झाला, हे परमार्थाला जास्त अपेक्षित आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात-पांडुरंगे सत्य केला अनुग्रह।
अनुष्ठान हे सत्य असते. अर्थात ब्रह्म सत्य, जगत् मिथ्या प्रमाणे ‘ब्रह्म’ हे सत्य आहे. म्हणजेच मला झालेला उपदेश हा सत्य आहे. सत्य म्हणजे जेथे भेद , अभाव नाही,अशी अवस्था होय. अशा सत्य तत्वाचा उपदेश भगवान पांडुरंगानी मला केला आहे. म्हणून, आता माझ्या मनातला संदेह निघून गेला आहे,असे संत तुकाराम महाराज सांगतात.

गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज पुढे याचा विस्तार करताना म्हणतात, जेथे माणसाच्या जीवनात संदेह निर्माण होतो, तेथे अध:पतन होते. या संशयाची व्याख्या करताना गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोलतात की, एका विशेष्यामध्ये विरुद्ध २ विशेषणाचे ज्ञान होणे, त्याला संशय म्हणा. या जगताला सत्य म्हणावे की असत्य म्हणावे? तेव्हा, तुकाराम महाराजच दृष्टांत देतात, याला दोन्हीही म्हणू नकात.

साडेतीन (३.५)मात्रा असलेला ओंकार (ॐ) हेच खरे अधिष्ठान असून ते ब्रह्म होय.
जिवा शिवा शेज रचिली आनंदे। मूळ असलेल्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जेव्हा माया आणि अविद्या या दोन्हीही उपाधी निघून जातात. तेव्हा, राहते ते जिव-शिव त्याची शेज ब्रह्मचैतन्यावर झाली, अर्थात जीव-शिव एैक्य झाले.अशी प्रस्तुत भूमिका गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज समजावून सांगतात.
पुढे संत तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्या सद्गुरुंनी डोक्यावर हात ठेवून अनुग्रह दिला असल्याने माझ्या मनातला अनेक विषयांच्या संबंधाने असलेला संशय निघून गेला. बुद्धीभेद नष्ट झाला. मला पांडुरंगाने केलेला उपदेश मी सर्व जगासमोर मांडण्यास उत्सुक झालो आहे. मला अनाहतपणे निजवल्याने माझी तृप्ती झाली आहे. मला पांडुरंगाने ज्ञान दिले आहे; भक्ती ही दिली आहे. त्यामुळे, मला समदृष्टी प्राप्त झाली आहे. निराकार वृत्ती झाल्याने कोणतेही भय राहिले नाही.
भगवान पांडुरंग दूसरा एक उपदेश संत तुकाराम महाराजांना करतात. संत नामदेव महाराज याप्रसंगी म्हणतात-सांगितले काम करावे कवित्व। वावगे वेगळेच बोलू नये।।
आता तुम्हाला जे अभंग तयार करायचे काम आम्ही सांगतो आहे. ते तुम्ही करताना वावगं काही न बोलता सुरु करा. तेव्हा, संत तुकाराम महाराजांनी संत नामदेवांना प्रार्थना केली. की, द्याल ठाव तर मी राहील पायाशी।* तुमची कृपा असेल तर मी तुमच्या संगतीत राहून अभंग रचितो. तुमच्या प्रेरणेने मी हे काम रुचिपुर्वक करीन. मला कोणाचा आधार नाही. मला तुम्ही आधार द्यावा. पुढे संत तुकाराम महाराजांच्या मुखातून अभंग स्फूरु लागले. संत तुकाराम महाराज म्हणतात, मी अभंग गाथा लिहिली ती केवळ संत नामदेवरायांच्या उपदेशामुळेच!