व्यंकय्या नायडूंचं वर्तन चुकीचं नव्हतं, काँग्रेस खासदाराने आक्षेप घेतल्याने समज दिली – खा. उदयनराजे
सातारा, २३ जुलै : काल दिल्लीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. हे रेकॉर्डवरही घेतलं जात नाही. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. नवीन सदस्यांनी भविष्यात हे लक्षात ठेवावे. हे सांगत असताना उदयनराजेंनी नायडू यांच्याकडे कटाक्ष टाकला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.


त्यानंतर राज्यसभेत झालेल्या प्रकारावर बोलताना उदयनराजे यांनी सांगितलं की, “व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही. काँग्रेसच्या एका खासदाराने आक्षेप घेतला असता त्यांनी फक्त समज दिली. त्यांनी रेकॉर्डवर फक्त घेतलेली शपथ जाईल आणि हे राज्यघटनेला धरुन नाही इतकंच सांगितलं”. पुढे ते म्हणाले की, “अनेकांनी वाद सुरु केला आहे. माझी त्या सर्वांना वाद थांबवा अशी हात जोडून विनंती आहे. महाराजांच्या नावे आतापर्यंत भरपूर राजकारण झालं आहे. जर महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता”.
याचबरोबर, व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचे केले नाही. त्यांनी काही चुकीचे केले असते, तर मीच माफीची मागणी केली असती, असे उदयनराजे भोसले म्हणाले. याशिवाय, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती आहे. आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झाले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करू नका. जे घडले नाही ते घडल्याचं भासवण्याचा प्रयत्न करु नका, माझी हात जोडून विनंती आहे, राजकारण करु नका, असे उदयनराजे भोसले म्हणाले.