उजनी 95 टक्के , भीमा-सीना बोगद्यात पाणी सोडण्याची तयारी
पंढरपूर- भीमा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यात उजनीला पाणी देवू शकणाऱ्या सहा प्रकल्पांचा समावेश असून येथून एकूण 21 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. तर भीमेवरील चासकमान परिसरात पावसाचा काल दिवसभर जोर होता.

दरम्यान उजनीत येणारी आवक वाढत आहे. रविवारी दुपारी साडेबारा वाजता दौंडची आवक 498 क्युमेक्स म्हणजेच 17 हजार 500 क्युसेक झाली होती तर प्रकल्प 94.95 टक्के भरला होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता आता उजनीतून भीमा-सीना बोगद्यात पाणी सोडण्याची तयारी करण्यात आली आहे. दुपारी दोन वाजता सुरूवातीला 100 तर नंतर 200 क्युसेकने पाणी सोडले जार्इल असे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

सध्या सीना माढा उपसा सिंचन योजनेसाठी 262 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. भीमा खोऱ्यातील अनेक धरणांवर आज सकाळपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने व तेथील प्रकल्प भरले असल्याने उजनीला पाणी देवू शकणाऱ्या सहा धरणांचे दरवाजे उघडून यातून जवळपास 21 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला,मुळशीसह घोड प्रकल्पातून आता 850 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
घोड उपखोऱ्यातील टेलएन्डची धरणे भरत आली आहेत. याच बरोबर आंध्रा 971, कलमोडी 561 तर कासारसार्इमधून 150 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. खडकवासला व मुळशी धरणातून 19 हजार क्युसेकहून अधिकचा विसर्ग असल्याने पुणे बंडगार्डनचा विसर्ग वाढला आहे. या पाण्याचा फायदा उजनीला होत असून दौंडची आवक वाढत चालली आहे.