तुळजापूर तालुका : काटी-जवळगाव रस्त्याची प्रचंड दुरवस्था
तुळजापूर तालुक्यातील काटी ते जवळगाव या डांबरी रस्त्याची जवळपास 25 ते 26 वर्षांच्या काळात एकदाही दुरुस्ती झाली नाही. या डांबरी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. याप्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्षदेण्याची मागणी नागरिकातुन केली जात आहे.

या रस्त्यावरील डांबरीकरण पुर्ण निघून गेल्यामुळे आता मात्र या रस्त्याचे दुरुस्ती शक्य नाही, तर रस्ताच नव्याने तयार करावा लागणार आहे. आता या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून चालताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काटी येथील बऱ्याच शेतकऱ्यांची जवळगाव (ता. बार्शी) शिवारात शेती असल्याने त्यांना दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्याच प्रमाणे यंदा काटी ते जवळगाव रस्त्यावर काटी पासून अवघ्या दोन अडीच किलोमीटर अंतरावर एक खाजगी गुळ कारखाना सुरु होत आहे.

या रस्त्यालगत उसाच्या हंगामात याच रस्त्यावरून उसाच्या गाड्या भरून जा-ये करीत असतात. तसेच काटी येथील नागरिकांसाठी उस्मानाबादला जाणे येणेसाठी या मार्गाचा अनेकजण अवलंब करीत असतात. या रस्त्यावरील रहदारीमुळे हा मार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहे. मात्र, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरील अनेक शेतकऱ्यांनी शेतातच बांधकाम करुन राहणे पसंत केले असून रस्त्याच्या काही अंतरावर आपली घरे थाटली आहेत. परंतु रस्त्याच्या या अवस्थेमुळे रात्री अपरात्री त्यांना येणे जाणेसाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. काटी ग्रामस्थांनी रस्त्याच्या कामाबद्दल अनेकदा संबंधित विभागाला विनंती करूनही उपयोग झाला नाही. नुकतेच काटी ग्रामपंचायतच्या वतीने कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग उस्मानाबाद यांना ग्रामपंचायतचा ठराव देऊन या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी दुतर्फा बाजूने खचला असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याची खडी निघून गेली आहे. शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी व ये-जा करण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून अनेक छोटेमोठे अपघात घडत आहेत. सध्या पावसाळा सुरु असून अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला. या भागात पाऊस पडला की, खड्ड्यात पावसाचे पाणी साचून राहील्याने रात्री-बेरात्री येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या रस्त्याचा वापर करणारे काटी व जवळगाव, आंबेगाव गावातील नागरिक आता सरकारी दिरंगाईला वैतागले आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.