दुःखद बातमी : जेष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन
‘मधुबन में राधिका नाचे रे’, ‘कभी आर कभी पार’, ‘ऐ दिल हैं मुष्किल’ यासारख्या सदाबहार गाण्यांना आपल्या अभिनयाने सजवणा-या ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे मंगळवारी निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. आरपार, सीआयडी, कोहिनूर, ललकार, आंखे यासारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांत त्यांनी अभिनय केला होता. दिवंगत अभिनेते जगदीप यांचा मुलगा नावेद जाफरी यांनी ट्विटद्वारे त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.


नावेद यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘आम्ही आणखी एक रत्न गमावले आहे. मी त्यांना लहानपणापासूनच ओळखत होतो आणि त्या आमच्या कुटुंबातीलच एक होत्या. एक उत्तम कलाकार आणि एक महान व्यक्ती. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो’, असे ट्विट त्यांनी केले आहे.
अभिनेते जॉनी वॉकर यांचा मुलगा नासिर खानने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कुमकुम यांना श्रद्धांजली वाहिली. ‘गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम यांचे निधन, त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक चित्रपट, गाणी, नृत्य सादर केले, जे त्यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते. माझे वडील जॉनी वॉकर यांच्यासमवेत त्यांनी बरेच चित्रपट केले होते. प्यासा आणि सीआयडी हे त्यापैकी दोन गाजलेले चित्रपट आहेत’, असे नासिर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.