बाबासाहेबांना पाहण्यासाठी बार्शीच्या रस्त्याने गावोगावी दुतर्फा लोटली होती गर्दी, बाबासाहेब म्हणाले..

0
27

बाबासाहेबांना पाहण्यासाठी बार्शीच्या रस्त्याने गावोगावी दुतर्फा लोटली होती गर्दी, बाबासाहेब म्हणाले..

भिमजयंती निमित्त व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांची विशेष लेखमाला #जगदीशब्द

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

“आपल्या सर्व प्रश्नांची किल्ली ही राजकीय सत्तेत आहे” हे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय भूमिका घेऊन प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजदूर पक्ष स्थापन केला व त्या पक्षाच्या माध्यमातून राज्यात 1937 साली पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी स्वतः बाबासाहेब महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून फिरत होते. वाड्यावस्त्यांवर जाऊन लोकांना सत्ता आली तर तुमचे प्रश्न सुटू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्यातीलच माणसाला निवडून द्यावे लागेल, हे समजावून सांगत होते.

गाववाड्यातील आयाबाया, बापुडे बाबासाहेबांचा शब्द मनात साठवत होते आणि स्वतंत्र मजदूर पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निश्चय करत होते. त्याच 1937 सालच्या निवडणूक प्रचार दौऱ्यात सोलापूरचे उमेदवार जीवाप्पा ऐदाळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः मैदानात उतरले होते व त्यांनी सोलापूर जिल्हा पिंजून काढला होता.

बाबासाहेब बार्शीत येणार ही वार्ता वाऱ्यासारखी बार्शी शहर आणि तालुक्यात पसरली होती. बाबासाहेब ज्या मार्गाने येणार त्या वाटेवरील गावातील लोक गर्दी करून रस्त्याच्या कडेने उभे होते. आत्ताच्या सारखे संसाधने नसल्याने, त्यांना बाबासाहेब नेमके किती वाजता येणार? याचा कोणालाच पत्ता नव्हता, पण आज बाबासाहेब येणार, एवढ मात्र लोकांना माहीत होतं आणि लोक सकाळपासून रस्त्याच्या कडेने उभा राहून हातात हार फुले घेऊन, ढोल ताशे तुताऱ्या लावून बाबासाहेबांच्या आगमनाची वाट पाहत होते. बार्शी तालुक्यातील मोठे गाव असणारे वैराग या गावातील लोकही अशाच प्रकारे बाबासाहेबांची वाट पाहत रस्त्याच्या कडेने उभे होते.

सकाळपासून कित्येक तास उलटले, बाबासाहेबांच्या वाटेकडे लोक डोळे लावून बसले होते. आयाबाया आपली चिलीपिली पोटाशी धरून रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीला बसल्या होत्या. एखाद्या गाडीचा आवाज आला की सारी माणसं उठून उभा राहायचे आणि बाबासाहेब आलेत का? हे उत्साहाने पाहायचे..

दुपारच ऊन रखरखत होतं. तळपता सूर्य एका बाजूला होता तर प्रज्ञासूर्याची वाट सारा समाज पाहत होता. तळपणाऱ्या सूर्याचे उन्हाचे चटके, आपल्या प्रज्ञासूर्याला पाहण्यासाठी लोक विसरून गेले होते. इतक्यात दुरून धुळीचे लोट उठताना दिसले, हारा फुलांनी सजवलेली एक मोटर गाडी येताना दिसायला लागली. लोकांना आपोआपच खात्री झाली की बाबासाहेब आले आहेत. सारे लोक उठून उभा राहिले, जयजयकार सुरू झाला. तुताऱ्याने वाजू लागल्या, ढोल ताशे वाजू लागले. आनंदाला पारावार उरला नाही, आयाबाया आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन रस्त्याच्या कडेला धावायला लागल्या. “कोण आला रे कोण आ.. दलितांचा राजा आला” अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला. बाबासाहेबांची मोटार गर्दीच्या जवळ येऊन उभी राहिली.

खरंतर गेली कित्येक वर्ष ज्यांचं नाव आपण फक्त पेपरातून वाचत होतो, रेडिओवर ऐकत होतो, ज्यांच्या विद्दवत्तेच्या कथा आपण एकमेकांना सांगत होतो, ऐकत होतो. तेच आपल्याला मुक्ती देऊ शकतात आपलं दैन्य दूर करू शकतात, असा पृथ्वीतलावरील एकमेव आपला मुक्तिदाता आज आपल्यासमोर आहे, यावर त्या गावातील आयाबाया आणि भावंडांचा विश्वास बसत नव्हता. सारे जण बाबासाहेबांच्या दर्शनासाठी बाबासाहेबांकडे धावत होते.

बाबासाहेबांना दुरून डोळे भरून पाहणाऱ्यांचे डोळे कधी भरून आले, त्यांनाही कळलं नाही, अनेक जण बाबासाहेबांना दुरून पाहत, हात जोडून आभाळाकडे पाहत होते. बाबासाहेब ज्या वाटेने आलेत त्या वाटेवरची माती उचलून कपाळाला लावत होते. दर्शनासाठी वाकणाऱ्यांना हाताने इशारा करत बाबासाहेबांनी दूर केलं. दर्शन घेऊ नका असे बाबासाहेब सांगत होते, पण ऐकायला कोणीही तयार नव्हतं. गर्दी आपल देहभान विसरून आपल्या मुक्तिदात्याला आपल्या नजरेत साठवत होती. स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. साऱ्यांना थांबवून घोषणा शांत करून त्या गर्दीसमोर रस्त्यावरच बाबासाहेब बोलायला लागले.

बाबासाहेब म्हणाले, माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे प्रेम पाहून मला खूप आनंद होतो आहे, आपल्या स्वतंत्र मजदूर पक्षाच्या वतीने आपण ही निवडणूक लढत आहोत. या निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार म्हणून आपण श्री जिवाप्पा ऐदाळे यांना उमेदवारी दिलेली आहे. तुम्हा सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्या जिवाप्पा ऐदाळे यांना मतदान करायचं आणि त्यांना निवडून द्यायचं. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण जिवाप्पा ऐदाळे यांना मतदान कराल व निवडून द्याल.


कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, आमिषाला बळी पडू नका. जिवाप्पा ऐदाळे यांना मतदान करा. तुम्ही माझं जे स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. असे म्हणत बाबासाहेबांनी सर्वांचे आभार मानले आणि बाबासाहेब थांबले.

बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द कानात प्राण आणून लोक ऐकत होते. बाबासाहेबांच्या दर्शनाने, बाबासाहेबांना पाहून, बाबासाहेबांना स्पर्श करून, आपण धन्य धन्य झालो. ही भावना तेथील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर व सांडून वाहत होती. त्या गर्दीकडे पाहत त्यांना हात करत आभार मानत.. बाबासाहेबांची पावलं मोटारगाडीकडे वळाली. कार्यकर्त्यांनी मोटारीचे दार उघडलं आणि बाबासाहेब गाडीत बसले. गाडीत बसलेल्या बाबासाहेबांना पाहून कार्यकर्ते पुन्हा घोषणा द्यायला लागले. सर्व बांधवांच्या जयघोषात बाबासाहेबांची मोटार बार्शीच्या दिशेने पुढे निघाली.

त्याच वाटेवर पुढे आणखीनही काही गावांमध्ये अशाच प्रकारे बाबासाहेबांचे दिमाखदार, प्रेमळ, सहद्य स्वागत करण्यात आलं. सर्वांना बाबासाहेबांनी जिवाप्पा ऐदाळे यांना मतदान करण्याचा आवाहन केलं, अखेर बाबासाहेबांचे मोटार बार्शी शहरात आली.

बार्शी शहर हे वैभव संपन्न शहर, औद्योगिक शहर, मोठी बाजारपेठ असणारे, शैक्षणिक प्रगती झालेले शहर, मराठवाड्याच्या सीमेलगत असल्यामुळे बार्शीला मोठे रहदारी असायची. कापूस उत्पादनाने बार्शीत कापड उद्योगाने भरारी घेतली होती. अशा उद्योग नगरीत बाबासाहेबांचे जंगी स्वागत होणार होतं.

बाबासाहेबांच्या स्वागतासाठी बार्शीतील कार्यकर्त्यांनी मोठी तयारी केलेली होती. बार्शीतील प्रसिद्ध कासारवाडीकर बँड ताफा बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आणण्यात आला होता. बार्शी तालुक्यातील आगळगाव, उपळे दुमाला, खांडवी, गौडगाव, पांगरी , पानगाव, वैराग अशा अनेक गाव खेड्यातून नागरिक मोठ्या संख्येने बाबासाहेबांच्या सभेला उपस्थित होते.


बाबासाहेबांचे बार्शी शहरात ज्या ठिकाणी आगमन होणार होते, तेथे सर्वजण बाबासाहेबांची वाट पाहत उभे होते. तालुक्यातून आलेली अफाट जनता आपल्या मुक्तदात्याचा दर्शनासाठी उत्सुक झाली होती. अखेर बाबासाहेबांचे बार्शी शहरात आगमन झालं आणि फटाक्यांची आकाशबाजी सुरू झाली. त्या काळात जे दारूचे फटाके उडवले जायचे त्या प्रकारचे ते मोठमोठे आवाज करणारे फटाके आभाळात निनादच होते. बाबासाहेबांचा जयघोष सर्वत्र होत होता. बाबासाहेबांच्या आगमन झाल्यापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंत बाबासाहेबांची वाजत गाजत सवाद्य मिरवणूक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत सुरू झाली. बाबासाहेबांना मिरवणुकीने मोठ्या उत्साहात सभेच्या ठिकाणापर्यंत आणण्यात आले.

बाबासाहेब मोटारीतून खाली पाय ठेवतात आणि बाबासाहेबांचे ते रूप, गौरवर्ण, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेच तेज, पावलांमध्ये आत्मविश्वास, भरदार शरीरयष्टी, पावलांमध्ये स्वाभिमान, करारी बाणा, आपल्या मुक्तिदात्याचे हे रूप पाहून सारे जण धन्य झाले. बाबासाहेबांना पाहून अनेकांनी हात जोडले आयाबायांच्या डोळ्यातून अश्व वाहू लागली. आभालवृद्ध बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत होते. बाबासाहेब सर्वांना हात वर करून अभिवादन करत होते. भव्य मंडपामध्ये बाबासाहेब यांचा आगमन झालं. मंडप खचाखच भरलेला होता. दहा हजारहुनही अधिक नागरिक त्या मंडपामध्ये उपस्थित होते. सर्वांनी उभा राहून टाळ्यांचा कडकडाट करत बाबासाहेबांचे स्वागत केलं, आणि बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार सुरू झाला, “कोण आला रे कोण आ, दलितांचा राजा आला” “बोलो भीम भगवान की जय” “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” अशा घोषणांनी प्रत्येक जण शहारून गेला आणि आभाळ निनादून गेलं. बाबासाहेबांना ओवाळण्यासाठी काही महिला पुढे आल्या, त्यांच्या ताटातील निरांजनातील प्रकाशाने बाबासाहेबांचा चेहरा अधिक प्रकाशमान दिसत होता आणि त्यापेक्षा जास्त प्रकाशमान ओवळणाऱ्या भगिनींचे चेहरे झाले होते की, आपणाला बाबासाहेबांचा औक्षण करण्याच भाग्य मिळत आहे. या भावनेने आणि विचारांनी त्यांचा चेहऱ्यावरून आनंद व सांडून वाहत होता.

विचारपीठावर सर्व मान्यवर स्थानापन्न झाले. बाबासाहेबांसोबत उमेदवार जिवाप्पा ऐदाळे कार्यक्रमाचे आयोजक व बार्शीचे बाबासाहेबांचे कार्यकर्ते मनोहर बोकेफोडे यांच्यासह पक्षाचे पुढारी विचारपीठावर स्थानापन्न झाले होते. घोषणा देणाऱ्या अनुयायांना निवेदक शांत करत होते व निवेदकाने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मनोहर बोकेफोडे यांना निमंत्रित केले.

मनोहर बोकेफोडे यांनी बाबासाहेबांचे बार्शी नगरीत स्वागत करत, बाबासाहेब हेच आता संबंध देशांमध्ये अस्पृश्यांना आधार उरलेले आहेत, आशा उरलेले आहेत असे सांगत बाबासाहेब हेच आपणास न्याय मिळवून देऊ शकतात. त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चला बाबासाहेबांनी पक्ष स्थापन केला त्यास बळ द्या, उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले. त्यांनी बाबासाहेबांना शब्द दिला की, आपले उमेदवार जिवाप्पा ऐदाळे यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देऊ.

यानंतर निवेदकाने बाबासाहेबांना भाषणासाठी निमंत्रित केले, बाबासाहेब खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि साऱ्या सभेमध्ये नवा जोशी निर्माण झाला. पुन्हा घोषणांनी सारा आसमंत निनादून गेला. “कोण आला रे, कोण आला दलितांचा राजा आला” “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो” घोषणा घुमत होत्या.
बाबासाहेबांची करारी नजर सर्वांवरती फिरली, बाबासाहेबांचा बुद्धिमत्तेने उजळून निघालेला चेहरा पाहून, बाबासाहेबांचा अभिवादन करण्यासाठी वर गेलेला हात पाहून, सारे जण आपोआप शांत झाले. बाबासाहेब एक एक पाऊल टाकत धीरगंभीर पणे माईक कडे पोहोचले.


बाबासाहेब बोलू लागले, बार्शीतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही माझं जे आनंदाने स्वागत केलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. बार्शी या शहरात मी दुसऱ्यांदा आलो आहे, बार्शी हे सोलापूर जिल्ह्यातील एक औद्योगिक व्यापारी व महत्त्वाचे शहर आहे, तालुका आहे. बार्शीला आपल्या चळवळीविषयी विशेष आस्था आहे. या ठिकाणी शाळा महाविद्यालय असल्यामुळे येथे शिक्षणाचा प्रसार ही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, पण आता आपल्याला हक्क आणि अधिकाराची लढाई लढणे गरजेचे आहे. हक्क आणि अधिकाराची किल्ली ही तुमच्या राजकीय सत्तेत आहे.

म्हणून आता आपल्याला आपले राजकीय प्रतिनिधी असेंबलीत पाठवणे गरजेचे आहे. आपल्या स्वतंत्र मजदूर पक्षाच्या वतीने जिवाप्पा ऐदाळे यांना मी उमेदवारी दिलेली आहे. रंजल्या गांजलेल्या अस्पृश्यांना, आदिवासी, वंचित आणि इतर सर्वांना न्याय मिळवून देण्याचा जाहीरनामा मी पक्षाच्या वतीने जाहीर केलेला आहे. आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे. म्हणून इथून तुमच्या समस्या समजून घेणारा, तुम्हाला न्याय देणारा उमेदवार मी दिलेला आहे , आपल्या उमेदवाराप्रमाणेच काँग्रेस आणि इतर पक्षाचेही वेगवेगळे उमेदवार उभे आहेत, त्यातही आपल्यातीलच अनेक बंडखोर आहेत, ते माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवत आहेत, पण कोणत्याही अफेवरती विश्वास ठेवू नका. बळी पडू नका. आपले उमेदवार म्हणजे फक्त आणि फक्त जिवाप्पा येदाळे आहेत. त्या मतलबी लोकांच्या अफवांना बळी पडून फसू नका ते गैरसमज पसरवत आहेत. आपल्या दुसरे कोणी उमेदवार नसून जीवापा येदाळे हेच आपले उमेदवार आहेत त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी विनंती आपल्या सर्वांना मी करतो, मला पुढच्या सभेला कुर्डूवाडी ला जायचे आहे असे सांगत बाबासाहेबांनी आपले भाषण थांबवलं.

भाषणानंतर बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर विविध संघटना व लोकांनी गर्दी केली. बाबासाहेबांचा सत्कार करताना बाबासाहेबांच्या जवळ जाऊन बाबासाहेबांना स्पर्श करणे, पाहणे यासाठी प्रत्येकजण धडपडत होता विद्वान बाबासाहेब, प्रकांड पंडित बाबासाहेब, देशाचे नेते बाबासाहेब, मुक्तिदाते बाबासाहेब आज आपल्या बार्शीत आहेत आणि आपण त्याचा सन्मान करतोय याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. सर्वांचा आदरातिथ्य स्वीकारत बाबासाहेबानी सर्वांना थांबण्याची विनंती केली. सर्वांचे आभार मानून ग्रामीण भागातील जनतेला अभिवादन करत, बाबासाहेब स्टेजवरून खाली उतरले, स्टेजवरून खाली उतरणारे बाबासाहेब अनुयायांना हिमालयासारखे भासत होते.

बाबासाहेबांना डोळे भरून पाहत, अनेकांच्या डोळ्यातून अश्रू पुन्हा पुन्हा वाहत होते. कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या दोन्ही बाजूने साखळी केली आणि बाबासाहेबांना मोटारी पर्यंत नेले, बाबासाहेब मोटारीत बसले लोकांना बाबासाहेबांनी हात केला आणि बाबासाहेबांची मोटार सुरू झाली. बाबासाहेबांची मोटार थोडी पुढे चालली होती, पण लोकांच्या चेहऱ्यावर मात्र आज एक वेगळाच आनंद आणि आत्मविश्वास होता. उत्साह होता की, आपण आपल्या देवाला पाहिलं , मुक्तिदात्याला पाहिलं. आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सांडून वाहताना दिसत होतं. प्रत्येक जण बाबासाहेबांना पाहिल्याचा, बाबासाहेबांना स्पर्श केल्याचा ठेवा मनात साठवून, त्या आनंदाने आपल्या गावाची वाट चालू लागला. बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश प्रत्येकाच्या मनात कोरला होता, “आपल्याला सत्ताधारी व्हावं लागेल.”

जगदीशब्द

जयभीम #jagdishoholspeech

जगदीश ओहोळ Jagdish Ohol संपर्क 📞 9921878801
(ज्ञात अज्ञात बाबासाहेब, त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना व विश्लेषण माझ्या आगामी पुस्तकातून येत आहे, त्यातील काही भाग भीमजयंती निमित्त येथे पोस्ट करत आहे. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा🙏 )


(फोटो संग्रहित)

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here