देशात केरळ हे राज्य सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून ओळखले जाते. पण ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य निर्माण करणार आहोत, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. ही मोहीम देशातील नव्हे, तर जगातील आरोग्य चळवळ ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील कोविड परिस्थिती व ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा आढावा घेतला.
– नावीन्यपूर्ण उपक्रम
कोल्हापूर जिल्ह्याने ‘नो मास्क, नो एण्ट्री’ असा उपक्रम राबवला दुकानदार, व्यावसायिक व व्यापाऱयांना यामध्ये सहभागी केले आहेत, गडचिरोली जिल्ह्याने या मोहिमेत महत्त्वाचा घटक असलेल्या आशा कार्यकर्तीला ‘थँक्यू आशाताई’ असे पत्र देणे, अकोल्यात ‘नो मास्क, नो सवारी’ अशी मोहीम तसेच सर्व रिक्षांमध्ये मोहिमेची गाणी वाजविणे किंवा पोस्टर्स लावणे, लोककलावंतांचा उपयोग करून घेणे, माजी सैनिकाना पथकांमध्ये सहभागी करून घेणे व लोकांना आरोग्य तपासनीस तयार करणे, संभाजीनगरमध्ये दवंडी पिटणे, सकाळी शहरातल्या घंटागाडय़ांमध्ये मोहिमेची आकर्षक जाहिरात केली. , नांदेडचे कोरोना विलगीकरण अभियान, बीडमधील मेळावे, सहव्याधी रुग्णांना शोधण्यावर नाशिकने दिलेला भर इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम विविध जिल्हा प्रशासन राबकीत आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे कौतुक केले आणि मोहीम मनापासून आणि दर्जेदार पद्धतीने चालवा अशीही सूचना केली. या बैठकीला सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दंडवसुली काटेकोरपणे करा
जगभर आता या विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल असे म्हटले जात आहे. कारण आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरूण पिढी कामावर जाऊ लागली आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांवर मोठा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लोककलावंतांची मदत
प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे, तिथे वेगवेगळ्या लोककलांची परंपरा आहे. या वेगवेगळ्या शैलींचा वापर करून आपल्याला या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. शाहिरी, खाडी गंमत, वाघ्या मुरळी, दशावतार, कीर्तन यासारख्या ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या माध्यमांचाही सध्याच्या परिस्थितीत योग्य ती आरोग्याची काळजी घेऊन उपयोग करून घ्यावे लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
– कोणाच्या आग्रहावरून किंवा अनावश्यकरीत्या औषधांचा वापर होऊ नये
– लॉकडाउन टाळायचा असेल जीवनशैली बदला
– सर्व विभागांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा.