हीच ती पंढरपूरची रिक्षा ; ज्यांचे आदित्य ठाकरेंनी केले आहे कौतुक

पंढरपूरच्या रिक्षाचालकाची डोंबिवलीत विनामूल्य सेवा
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना करताहेत मदत

सोलापूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जग मेटाकुटीला आले आहे. कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच सर्व वाहतूक सेवाही ठप्प आहे. त्यामुळे  अत्यावश्यक सेवेत काम करणारे डॉक्टर, नर्स, पोलिस, वैद्यकीय अधिकारी यांना कार्यालयात तसेच रुग्ण यांना हॉस्पिटलमध्ये  पोहोचण्यात अडचणी येत होत्या. अशा वेळी पंढरपूरचा एक रिक्षाचालक डोंबिवलीकरांसाठी धावत येऊन विनामूल्य सेवा देत आहेत.

रुपेश रेपाळ असे त्या रिक्षाचालकाचे नाव असून ते मूळचे माढा तालुक्यातील  तुळशी या गावचे आहेत. ते बरीच वर्षे पंढरपूरमध्ये राहिले होते. पंढरपुरात केवळ वारीच्या वेळेस रिक्षाचा धंदा चालतो. मात्र इतर वेळेस हाताला काम नसल्यामुळे ते कामानिमित्त डोंबिवलीमध्ये आले. येथे ते रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह चालवतात. 2012 पासून डोंबिवलीत रिक्षा चालवतात. डोंबिवली पूर्व येथील राजाजी पथ येथील म्हात्रेनगर येथे त्यांचा थांबा आहे.

मुंबईत कडक संचारबंदी असल्याने अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पोचवणे अवघड झाले. त्यांच्याकडे पैसे देखील नसायचे. अशा कठीण प्रसंगी रुग्णांना आपण मदत करावी या हेतूने त्यांनी विनामुल्य रिक्षा सेवा देण्याचे ठरवले. मात्र संचारबंदी लागू असल्याने त्यांना यात अडचणी येऊलागल्या. अशा वेळी त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मोफत रिक्षा सेवेची कल्पना दिली. आरटीओ अधिकाऱ्यांनी रेपाळ यांची ही सेवा पाहून त्यांना रिक्षा चालवण्यासाठी परवाना दिला. त्यामुळे रुग्णांना वा अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना रिक्षासेवा देणे सुलभ झाले.

देशात लॉकडाऊन लागू झाल्यापासून ते अात्यावशक सेवेत काम करणाऱ्या तसेच रुग्णांना आपल्या रिक्षामधून मोफत सेवा देत अाहेत. आतापर्यंत पाचशेपेक्षा अधिक लोकांना आणि रुग्णांना मोफत रिक्षा सेवेचा लाभ घेतला अाहे. लॉकडाऊन संपेपर्यंत ही मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार असल्याचे रेपाळ यांनी सांगितले. रेपाळ यांनी आपल्या रिक्षावर अत्यावश्यक सेवा काम करणाऱ्यांना व रुग्णांना मोफत रिक्षा सेवा देत असल्याचे खडूने लिहिले आहे. त्यांचे हे काम पाहून सुरुवातीच्या काळात नगरसेवक मुकुंद पेडणेकर आणि सामाजिक कार्यकर्ते अमित कासार यांनी त्यांना आर्थिक मदत दिली.

चौकट

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून कौतुक

रुपेश रेपाळ हे गेल्या तीन महिन्यांपासून मोफत रिक्षा सेवा देत असल्याची बातमी राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली. रेपाळ यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी स्वतः पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी रेपाळ यांना फोन करून कौतुक केले. तसेच मदत लागल्यास फोन करा, असे देखील आदित्य ठाकरे यांनी रेपाळ यांना सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*