बार्शी तालुक्यातील लक्ष्याचीवाडी शिवारात पती पत्नीचे पैसै,सोने लुटले,एका चोरट्यास अटक
तालुक्यातील लक्ष्याचीवाडी शिवारात पती पत्नीचे पैसै,सोने लुटले,एका चोरट्यास तालुका पोलीसांकडून तातडीने अटक

बार्शी: शेतातील दैनंदिन कामकाज संपवून घराकडे निघण्याच्या तयारीत असलेल्या पती-पत्नीला तिघांनी मिळून धक्काबुक्की करत त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील लक्ष्याचीवाडी शिवारात घडला.दरम्यान पोलिसांनी तातडीने याबाबत पावले उचलून एका चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
विजय कास्तुर भोसले रा. उपळाई ठोंगे ता. बार्शी असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

धनंजय शिवाजी चव्हाण वय 40 वर्षे रा तानाजी चौक, बार्शी यांनी याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 27/3 / 2021 रोजी सायं 07.00 वा सुमारास ते लक्ष्याचीवाडी शिवारात शेतात उपळाई रोड कॅनॉलच्या जवळ लक्ष्याचीवाडी येथे असताना फिर्यादी व फिर्यादीची पत्नी जयश्री असे शेतातून परत येण्यासाठी निघाले असताना फिर्यादीचे शेतात उपळाई रोड, कॅनलच्या जवळ, तीन अनोळखी इसम अचानक फिर्यादी व फिर्यादीचे पत्नी जवळ आले व त्यांनी फिर्यादीला धक्काबुक्की करून फिर्यादी जवळ असलेली रोख रक्कम तसेच फिर्यादीचे व फिर्यादीचे पत्नीच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच मोबाईल असा एकूण 95,100/- किंमतीचा वरील वर्णनाचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेऊन पळून गेले होते.
याबाबत अज्ञात तीन चोरट्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि शिवाजी जायपत्रे व हवालदार राजेंद्र मंगरुळे यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवून या का संशइतास ताब्यात घेतले होते.
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.