पंढरपूरः प्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करतात. त्यांच्यासोबत राज्यातील एका दाम्पत्यालाही पूजेचा मान दिला जातो. यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत पुजेचा मान असणाऱ्या मानाच्या वारकऱ्याची निवड करण्यात आली आहे. विठ्ठल बडे असं त्याचं नाव आहे.

विठ्ठल ज्ञानदेव बडे हे विठ्ठल मंदिरात गेली सहा वर्ष विणेकरी म्हणून सेवा करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात मंदिरात चोवीस तास विणेकरी म्हणून सेवा देणारे बडे या ८४ वर्षाच्या भक्ताला हा मान देण्याचा निर्णय घेतल्याचं मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

विठ्ठल बडे यांचं संपूर्ण कुटंब माळकरी आहे. बडे याचं मुळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर येथे आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढी वारीला वारकरी नाहीत. त्यामुळं दर्शन रांग नाही. म्हणून यंदा मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी कोण ठरणार याबाबत प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून मंदिर समितीनं चिठ्ठी टाकून निवड करावी असी ठरवण्यात आलं. त्यानुसार मंदिरातील सहा विणेकऱ्यांची नावं चिठ्ठीत लिहली गेली. त्यातील एका चिठ्ठीतील विठ्ठल बडे यांना महापूजेचा हा मान मिळाला आहे.


दरम्यान, सरकारने मानाच्या दहा पालख्यांसह मोजक्याच मानकऱ्यांना पंढरपूर प्रवेशाची परवानगी दिली आहे. त्यामुळे या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलीस तसेच स्थानिक प्रशासन दक्षता बाळगत आहे.
