सोलापूर : राज्यात कोरोनाचे (corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा या ऑनलाइन (online exams) घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (solapur university) पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती दिली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरू
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याची तयारीदेखील सुरू केली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विद्यापीठ प्रशासनाच्या बैठकीत विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे परीक्षा संचालक शाह यांनी सांगितले आहे.
२६ एप्रिल २०२१ पासून पारंपारिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील

इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमाच्या सत्र एक ते चारच्या परीक्षा ५ मे २०२१ पासून सुरू होतील, अशी संभाव्य तारीख दिली गेली आहे. तर, पारंपरिक अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून २६ एप्रिल २०२१ पासून पारंपारिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होतील, अशी संभाव्य तारीख आहे.
ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका ही ५० गुणांची असेल
अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल, असे परीक्षा संचालक सीए शाह यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांची प्रश्नपत्रिका ही ५० गुणांची असणार आहे. त्यानुसार विद्यापीठ परीक्षा विभागाकडून रचना करण्यात येत असल्याची माहिती आहे.