पुरात वाहून गेलेल्या बार्शीतील व्यक्तीचा तब्बल चार महीन्यानंतर सापडला सांगाडा
शर्टावरून ओळख पटली
गणेश भोळे
बार्शी प्रतिनिधी
१४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या अतिवृष्टी होवून बार्शी शहर व तालुक्यात नदी, नाले, ओढे यांना महापूर आला होता. बार्शी शहरातील सर्व नाले व पुलावरून पाणी वाहत होते. याचवेळी शहरातील राणा कॉलनी येथे वास्तव्यास असलेले अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी हे पूल ओलांडून घराकडे जात असताना पुराच्या जोरदार प्रवाहामुळे पाण्यात वाहून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेवुनही ते सापडले नव्हते. याबाबत त्यांनी पोलिसात पती बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दिली होती. दुर्दैवाने आज शहराजवळील एका शेतालगत ओढ्यात एका काटेरी बाभळीच्या झाडात मानवी सांगाडा आढळला. तो अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी यांचाच असल्याची ओळख नातेवाईकांकडून पटली आहे.

अधिक माहिती अशी की, अजय चौधरी यांच्या पत्नी स्वाती चौधरी या सकाळी घरकाम करत असताना त्यांना तुळजापूर रोडवरील हॉटेलच्या पाठीमागे मुळे यांच्या शेतालगत ओढ्यातील काटेरी बाभळीच्या झाडात एक मानवी सांगाडा सापडला असल्याचे सांगण्यात आले.

तो सांगाडा त्यांचे पती अजय उर्फ दादा यांचा असल्याचा संशय आहे, असे सांगुन बोलावून घेतले. त्यानंतर त्या, दीर, सासू आदींसोबत सदर ठिकाणी पोहचल्या. तेथे पोलीस आले होते व इतर लोकही जमले होते. ओढयामध्ये दाट काटेरी चिलारी बाभळीच्या खोडामध्ये एक मानवी सांगाडा आडकला होता.

त्याचे मानेच्या हातामध्ये एक शर्ट गुंतलेला होता. स्वाती व त्यांच्या नातेवाईकांनी मानवी सांगाडा पाहून त्यामध्ये मानेच्या हातामध्ये गुंतलेला शर्ट पाहुन ओळखुन खात्री केली. सदरचा शर्ट हा त्यांचे पती अजय उर्फ दादा यांनी वाहुन गेले त्या दिवशी घातलेला होता व सांगाड्याची बांधणी पाहता सांगाडा त्यांचे पतीच्या शरीरयष्टीशी मिळता जुळता आहे. यावरून हा सांगाडा त्यांचे पती दादा यांचाच असल्याची खात्री पटली.
याबाबत स्वाती चौधरी यांनी पोलिसात जबाब दिला आहे तब्बल साडेतीन महीन्यानंतर हा सांगाडा सापडल्याने आजवर बेपत्ता अजय याचा सांगाडा मिळाल्याने चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करून ओळख पटल्याने सांगाडा नातेवाईकांकडे सोपविला.

सापडलेल्या मानवी सांगाड्याची ओळख पटली असून सांगाडा नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून त्याचा डीएनए काढून घेतला आहे. याबाबत पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही होईल
- ज्ञानेश्वर उदार, सहायक पोलिस निरीक्षक, बार्शी