रुग्णसेवेचा मानदंड निर्माण करणारे सेवावृत्ती धन्वंतरी डॉ. बी वाय यादव

0
538

रुग्णसेवेचा मानदंड निर्माण करणारे सेवावृत्ती धन्वंतरी डॉ. बी वाय यादव

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचा विचार वारसा आपल्या कृतीशील जीवनकार्यातून यशस्वीतेकडे वाटचाल करणारे एक स्फूर्तीदायी व प्रेरणादायी सर्जनशील धन्वंतरी म्हणजे मा. डॉ. बी. वाय. यादव साहेब होत. सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात व देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या रुग्णसेवेचा मानदंड निर्माण करणारे सेवावृत्ती धन्वंतरी म्हणून डॉ. यादव साहेब यांचा नावलौकिक आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

समाजातील गरीब, शेतकरी, शेतमजूर व गरजू लोकांच्या कल्याणकारी विकासासाठी समर्पित व्यक्तिमत्व म्हणून डॉ. यादव साहेब ओळखले जातात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर लिलया मात करत सर्व समाजघटकांशी नातेसंबंध व ऋणानुबंध निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांनी देखील प्रेरणा घ्यावी असे व्यक्तिमत्त्व त्यांनी निर्माण केले आहे. म्हणूनच आपल्या अविचल ध्येय निष्ठा व कठोर परिश्रम यांच्या जोरावरच ते आज विविध पदावर मानसन्मानांसह कार्य करत आहेत.

डॉ. यादव साहेब यांचा जन्म ग्रामीण भागातील एका खेडेगावात झाला. वरकुटे हे त्यांचे मूळ गाव. आपल्या गावातच त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी मौजे नेरले या ठिकाणी प्रवेश घेतला.आई हौसाबाई व वडिल यशवंतराव यांच्या प्रामाणिक तळमळी साठी डॉ.यादव साहेब यांनी शैक्षणिक घोडदौड चालू ठेवली. बार्शी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर डॉ. यादव साहेब यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेणारे महान कर्मयोगी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या संस्कार शाळेत डॉ. यादव साहेब यांचा प्रवेश झाला.

जीवनाचे नंदनवन फुलविण्यासाठी कष्ट व त्याग आवश्यक असतो. कर्मवीर मामांच्या ‘कमवा आणि शिका’ या योजनेतून डॉ.यादव साहेब यांनी शिक्षण पूर्ण केले. कर्मवीर मामांचे संस्कार व विचारधन डॉ. यादव साहेब यांनी आत्मसात केले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. यादव साहेब यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळवला. मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. यादव साहेबांच्या वैद्यकीय शिक्षणाची सुरुवात झाली.आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुरु डॉ. कौंडिण्य व डॉ.फ्लेचर यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले.

प्रगल्भ बुद्धिमत्ता व अखंड ज्ञानसाधना याद्वारे डॉक्टर यादव साहेब हे त्यांच्या गुरूंचे लाडके शिष्य झाले. आपल्या या प्रतिभेच्या जोरावर डॉ. यादव साहेब यांनी राष्ट्राबरोबरच परदेशात ही सेवा करावी असे डॉ. फ्लेचर यांना वाटत असे. तसा विचार देखील त्यांनी बोलून दाखवला. परंतु ज्या समाजातून मी आलो आहे, त्या समाज बांधवांच्या रूग्नसेवा कार्यासाठी व कर्मवीर मामांच्या विचार संस्कारातच सेवा करण्याचा डॉ.यादव साहेब यांनी निश्चय केला.

कर्मवीर मामांच्या आजारपणात सेवा करण्याची संधी डॉ. यादव साहेबांना मिळाली. यातूनच कर्मवीर मामांचा परिसस्पर्श डॉ. यादव साहेबांना लाभला. कर्मवीर मामांनी देखील या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व जाणले व त्यांना बार्शी येथेच रुग्णसेवा करण्यास प्रवृत्त केले. अपार कष्ट व नैतिक मूल्ये या संचयातूनच डॉ. यादव साहेब यांचे जीवन कार्य समृद्ध होत गेले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून यादव साहेबांनी आपले व्यक्तिमत्त्व घडविले आहे.

हे करत असताना त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी आदरणीय डॉ. सौ.मीराताई यादव यांचे कार्य उल्लेखनीय आहे. उच्च विद्याविभूषित डॉ. मीराताई यादव या देखील ख्यातनाम स्त्री रोग तज्ञ म्हणून रुग्णसेवा करत आहेत. डॉ. यादव साहेबांच्या वैभवशाली जडणघडणीत डॉ. मीराताई यादव यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. डॉ. यादव साहेबांचे सुपुत्र डॉ. पुष्कराज किडनी स्पेशालिस्ट व डॉ. पल्लवी हे देखील वैद्यकीय सेवा करत आहेत. या बरोबरच त्यांच्या स्नुषा डॉ. सौ. स्मिता याही वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व प्रतिभासंपन्न आहेत.

त्यांनी मुंबई विद्यापीठात मेडिसीनमध्ये सुवर्णपदक संपादन केले आहे. या सर्वांमुळेच डॉ. यादव साहेबांना त्यांच्या रुग्णसेवेचा अभिमान व आदर आहे. एकविसाव्या शतकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकतम संधी मिळवून देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न ते श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना करत असल्याचे दिसून येते. ज्ञानसंपन्न व परिपूर्ण विकासित व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे यावर त्यांचा नेहमी भर राहिला आहे.

गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच राष्ट्र विकास करता येतो यावर डॉ. यादव साहेबांचा प्रचंड विश्वास आहे. केवळ कमकुवत आर्थिक परिस्थिती व अज्ञानामुळे एकही विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहिला नाही पाहिजे याकडे त्यांचे विशेष लक्ष आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना डॉक्टर यादव साहेबांनी अनेक नवोपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या नेमणुका, भौतिक सुविधा, सुसज्ज इमारती, समृद्ध ग्रंथालये, क्रीडांगणे, जलतरण तलाव, योगासन केंद्र, गुणवत्ता प्रकल्प, कर्मवीर स्कॉलर अॅकेडमी, मुला-मुलींसाठी वस्तीग्रहे, विविध ज्ञानशाखांचा विस्तार व विकास, महिला सक्षमीकरण, स्पर्धा परीक्षा केंद्र आदी उपक्रमांचा समावेश आहे. जगदाळे मामा हॉस्पिटल ला प्रशिक्षित तंत्रज्ञ उपलब्ध व्हावेत म्हणून नर्सिंग कॉलेज स्थापन करण्यात आले. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध ज्ञान व माहिती पुरविण्याचे साधनस्रोत केंद्र म्हणून कृषी विद्यालय उभारले.

प्रगत तंत्रज्ञानाची ओळख व उद्बोधन व्हावे या हेतूने कर्मवीर माहिती तंत्रज्ञान केंद्र सुरू केले. या व अशा गुणवत्तापूर्ण कार्यामुळेच डॉ. यादव साहेब हे एक सर्जनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहेत. कर्मवीर डॉ. मामासाहेब यांच्या त्याग व प्रेरणेतून गोरगरिबांसाठी सुरू असलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटलच्या विकासात देखील डॉ. यादव साहेबांचे योगदान आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतून सुरु केलेल्या या हॉस्पिटलमध्ये आज ३५० बेडसह अत्याधुनिक सुविधा दिल्या जात आहेत.

ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्णांना अल्पदरात रूग्णसेवा देण्याचा प्रयत्न या हॉस्पिटलमधून केला जात आहे. म्हणूनच गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारे हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. तज्ञ व विशेष वैद्यकीय सेवा यातून पुरविले जात आहेत. डॉ. यादव साहेबांच्या कार्यातूनच आज सुसज्ज असे ट्राॅमा युनिट देखील उभारले जात आहे. जगदाळे मामा हॉस्पिटल चे २५ वर्षे अध्यक्ष म्हणून डॉ. यादव साहेब यांनी कार्य केले आहे.

दर्जेदार, तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स आणि सेवाभावी कर्मचारी यांच्या सहकार्यातून या हॉस्पिटलचा नावलौकीक वाढविण्यावर डॉ. यादव साहेबांचा भर राहिला आहे. लोकाश्रय आणि लोकसहभागातून या हॉस्पिटलच्या विकासासाठी डॉ. यादव साहेब प्रयत्न करीत आहेत. श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे नेतृत्व करताना कर्मवीरांचे विचारधन जोपासण्याचा डॉ. यादव साहेब प्रयत्न करत आहेत.

संस्थेतील विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाला पाहिजे; प्रशिक्षित, तज्ञ व कौशल्याधिष्ठित विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेतून निर्माण व्हावेत अशी त्यांची मनोधारणा आहे. संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी कार्याचा डॉ. यादव साहेबांचा नेहमी प्रयत्न आहे. संस्थेमधील विद्यार्थिनी, महिला शिक्षक व कर्मचारी यांच्यात सक्षमता विकसित करण्यासाठी जिजाऊ -सावित्री- रमाई महीला बळ विकास समिती द्वारे डॉ. यादव साहेब प्रयत्नशील आहेत. संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.

यासाठी डॉ.यादव साहेब विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अग्रेसर आहेत. कर्मवीर मामांच्या जयंतीदिनी समाजप्रबोधन उपक्रम राबविण्यात डॉ. यादव साहेबांचे योगदान आहे. कर्मवीर मामांना आपल्या संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी जातिभेद विरहित एकजिनसी समाजाचे प्रेरक व्हावेत असे वाटत असे. तीच विचारधारा डॉ. यादव साहेब आमलात आणून समाज कार्य करत आहेत. डॉ. यादव साहेब हे शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे एक कृतिशील नेतृत्व आहेत.

संस्थेचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेतच, त्याचबरोबर विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्था व संघटना यामध्ये देखील त्यांचा सहभाग आहे. वैद्यकीय संघटना, भगवंत देवस्थान, स्वामी विवेकानंद केंद्र आदी माध्यमातून ते नेहमी समाज घडणीसाठी प्रयत्नशील आहेत. म्हणूनच बार्शी शहरात सर्वप्रथम सर्वधर्मसमभाव परिषद आयोजित करण्यात यादव साहेबांचे उल्लेखनीय योगदान आहे. समाज उद्बोधन व सामाजिक विकास या दोन्ही कार्यासाठी डॉ. यादव साहेब आपला वेळ देत आहेत.

यातूनच त्यांना समाज विकासाची असलेली धडपड दिसून येते. डॉ. यादव साहेबांच्या या बहुआयामी कार्यामुळे त्यांना अनेक संस्था, संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. डॉ. यादव साहेबांना मी माझ्या शैक्षणिक प्रवासापासूनच ओळखत आहे. बी.एड.,एम.एड., पीएच. डी.अशा पदव्या प्राप्त करण्यासाठी मी या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. माझ्या विद्यार्थी दशेपासूनच मी डॉ. यादव साहेबांचे नेतृत्व पाहिले आहे. कमलापूर येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असताना शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथील एम.एड. विभागामध्ये मला कार्य करण्याची संधी आली.

मी क्षणातच होकार दिला व बार्शी येथे एम.एड. विभागासाठी शिक्षक म्हणून कार्य करण्यास आलो. यानंतर बी. एड. विभागाकडे भूगोल अध्यापन पद्धती या विषयासाठी माझी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. २०१५ मध्ये मी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून नियुक्त झालो. अपार कष्ट, मेहनत,त्याग अशा गुणांवरच यश संपादन करता येते या उक्तीप्रमाणेच डॉ.यादव साहेबांच्या कुशल प्रेरणेतूनच मी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. प्राचार्य म्हणून कार्य करताना डॉ. यादव साहेब व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य यांच्याशी अगदी जवळचा संबंध आला.

आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्ता व कुशलतेच्या जोरावर डॉ. यादव साहेब कसे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत हे मला अगदी जवळून पाहता येतात. यातूनच नाविन्यपूर्ण काम करण्याची मला प्रेरणा मिळते. कठीण व गुंतागुंतीच्या प्रसंगातील समस्या कशी सोडवावी यासंदर्भात डॉ. यादव साहेबांचे ज्ञान व कौशल्य मी पहात आहे. डॉ. यादव साहेब मला प्रेरक व मार्गदर्शक आहेत. महाविद्यालयाच्या विकासात व जडणघडणीत डॉ. यादव साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन मिळते. डॉ. यादव साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त, कार्यकारणी सदस्य, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज प्राचार्य म्हणून यशस्वीपणे कार्य करीत आहे.

डॉ. यादव साहेबांच्या या कार्यामुळेच श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीला शैक्षणिक वर्ष २०१९ चा ‘आदर्श शिक्षण संस्था’ म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच डॉ. यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाने मी केलेल्या कामाचा गौरव म्हणून मलाही शैक्षणिक वर्ष २०१९ चा ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार देऊन विद्यापीठाने सन्मानित केले आहे.

कर्मवीर मामांचे विचारधन, डॉ. यादव साहेबांचे कल्पक नेतृत्व, संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्या सहकार्याचा हा परिपाक आहे. डॉ. यादव साहेब माझ्या सारख्या व्यक्तित्वाला लाभलेले एक वरदानच आहे. म्हणूनच ‘सर्जनशील धन्वंतरी’ या शब्दातच डॉ. यादव साहेबांचा गौरव करणे उचित ठरेल. डॉ. यादव साहेबांच्या भावी वाटचालीस व आरोग्यमय जीवनास  हार्दिक शुभेच्छा !                                                                                 

        प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, बार्शी मो. नं. ९८५०३६८३८५

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here