नव-याची मैत्रीण म्हटलं की बायकोचा पारा का चढतो? वाचावा असा लेख

0
781

नव-याची मैत्रीण म्हटलं की बायकोचा पारा का चढतो? वाचावा असा लेख

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तर अशा या नव-याच्या मैत्रिणीबद्दल बायकांचं काय म्हणणं असतं हे जगजाहीर आहे. पण लग्न झालेल्या पुरुषांचं आपल्या या मैत्रिणींबद्दल काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी जरा पुरुषांच्याच मनात डोकावून बघण्याचा प्रयत्न करूयात.

शाळेच्या ग्रुपवर ब-याच वर्षांनी ती सापडते, गेट टुगेदरला भेट होते आणि जुनी मैत्रीण नव-याच्या आयुष्यात येऊन बसते. मोबाइलवरचे मेसेज वाचता वाचता मध्येच त्याच्या चेह-यावर स्मितहास्याची एक लकेर पसरते आणि बायकोच्या काळजात धस्स होतं.

‘येताना भाजी आणा,’ बायकोचा हा मेसेज बघायलासुद्धा ज्याला वेळ नव्हता तो मैत्रिणीचा प्रत्येक मेसेज बघून लगेच त्यावर रिप्लाय देताना बघून बायकोच्या मनात संताप आणि असूयेच्या लाटा उसळायला लागतात. मनानं आणि शरीरानंही हवी तेव्हा मी उपलब्ध असताना याला मैत्रीण लागतेच कशाला? बायकोच मैत्रीण असू शकत नाही का? असा सर्वसाधारणपणे बायकांचा प्रश्न असतो.

आणि याच्या अगदी उलट नव-याच्या मनात बायको आणि मैत्रीण हे अगदी वेगळे कप्पे असतात. बायको बरोबर त्याचं एक रूटीन सेट झालेलं असतं. नाही म्हटलं तरी कालांतरानं ती दोघं एकमेकांना गृहीत धरायला लागलेली असतात. लग्नाच्या वाढदिवशी दोघेच जेवायला म्हणून बाहेर गेले तरी मसाला पापड संपेपर्यंत त्यांच्यातला विषय ‘तुला आईंच्या समोर स्पष्ट बोलता येत नाही का?’वर घसरलेला असतो. अशात पुरुषाला मैत्रीण जास्त रिफ्रेशिंग वाटते.

काम, संसार यांच्या पलीकडच्या विषयांवर तो तिच्याशी बोलू शकतो. आणि जरी ती मैत्रीण तिच्या संसाराबद्दल त्याच्याशी बोलली तरी त्या केसमध्ये हा स्वत: पार्टी नसल्यानं ते त्रयस्थपणे ऐकून एन्जॉय करू शकतो. त्यामुळे बायकोशी बोलताना ‘मुद्दय़ाचं काय ते पटकन बोल’ म्हणून उरकतं घेणारा नवरा, मैत्रिणीशी मात्र तासन्तास गप्पा मारू शकतो.

बायकोचे प्रश्न सोडवताना नवरा कावलेला असतो कारण बहुतेकवेळा तो आरोपीच्या नाहीतर साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभा असतो. मात्र तेच मैत्रिणीच्या प्रश्नावर सल्ला देताना त्याचा इगो सुखावत असतो. प्रापंचिक जबाबदा-याचा वाळवंट पार करताना भावनिक दमछाक प्रत्येकाचीच होत असते. आणि अशावेळी मैत्रीण नावाची ही हिरवळ हवीशी वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे.

पण. अशा एखाद्या हिरवळीवर आपला नवरा जाऊन बसल्याचं लक्षात येताच बायकोच्या डोक्यात शनया आणि गॅरीचा ट्रॅक सुरू होतो. घरी पंचपक्वान्नाचं ताट वाढलेलं असताना आमच्या यांना टपरीवरच्या वडा रस्स्यातच का तोंड घालायचं असतं असले प्रश्न पडू लागतात.

नव-याच्या मैत्रिणीला त्या थेट स्पर्धक समजायला लागतात. तिच्यात असं काय आहे जे माझ्यात नाही? या अजिबात गरज नसलेल्या गोष्टीचा उगाच शोध घेत बसतात. तो बाथरूममध्ये गेला की पटकन त्याचा मोबाइल तपासायला लागतात. त्यानंच त्याच्या पाठीवर खाजवल्यानं उठलेल्या व्रणाकडे संशयानं बघू लागतात.

परंतु बहुतेक वेळा नव-याची ही मैत्री बायकोच्या स्थानाला आव्हान देणारी नसते।

पण या सगळ्यापलीकडे पण माणसाच्या काही भावनिक गरजा असतात. पैकी काही फक्त विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडूनच पूर्ण केल्या जाऊ शकतात. बायकोशी कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तरीही मैत्रिणीची जागा ही वेगळीच असते.

माणसाच्या आयुष्यात मैत्रीची ही स्पेस अत्यंत आवश्यक असते, हे समजून घेतलं तर सहजीवन सोपं होऊ शकतं. अर्थातच, मैत्रीच्या या नात्याआड पुरुष जोवर पत्नीची फसवणूक करत नाही तोवरच पत्नीच्या या समजूतदारपणाला अर्थ आहे.

पण अन्यथा बायकोनं आपल्या नव-याच्या या हेल्दी मैत्रीला स्वीकारलं पाहिजे. फक्त ती समवयीन बाई आहे म्हणून त्यांच्या मैत्रीच्या नात्यावर संशय घेऊ नये. बायकोत मैत्रीण सापडत नाही म्हणून मैत्रिणीत बायको शोधण्याची निसरडी जागा, स्री-पुरुष मैत्रीत असू शकते. पण आपला नवरा त्या निसरड्या जागेपर्यंत पोहचूच नये यासाठी बायकोनंपण खबरदारी घेतली पाहिजे.

एक पुरुष म्हणून मला वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. कारण आपल्या नव-याच्या आयुष्यातल्या आई आणि बहीण रूपातल्या बायका स्वीकारायला तिला जड जातात, तर ही मैत्रीण नावाची बला तर खूपच दूरची आहे; पण सामंजस्य आणि विश्वास असेल तर नव-याची मैत्रीण ही बायकोचीपण मैत्रीण होऊ शकते. आणि मित्रमैत्रिणींच्या सहवासात आयुष्याचा प्रवास छान पार पडू शकतो.

हा लेख वाचणा-या माझ्या तमाम मैत्रिणींवर माझा पूर्ण विश्वास आहे की माझे हे विचार त्या अत्यंत गांभीर्यानं घेतील आणि आपापल्या नवऱ्याच्या मैत्रिणींना सहज स्वीकारतील.

शाळेच्या ग्रुपमधल्या त्या मैत्रिणीला तो एखाद दिवशी घरापर्यंत सोडायला गेला तरी त्या गैरसमज करून घेणार नाहीत. गुड मॉर्निंगचा एखाद दुसरा मेसेज किंवा बॉर्डर लाइन पांचट जोक मैत्रिणीला फॉरवर्ड करण्याची मुभा तुम्ही नव-याला नक्की द्याल. आणि मग बघा तुमचा संसार किती छान होईल.

काही दिवस असेच मजेत जातील आणि मग एके दिवशी तुमचापण मोबाइल चमकेल. आणि सकाळी सकाळी आवरून सावरून तुम्हीपण लगबगीनं बाहेर जायला निघाल. ‘मैत्रिणींची भिशी का?’ असं तो उगाच विचारेल.

पण तुम्ही खरं कारण सांगाल, ‘शाळेतला एक जुना मित्र बंगलोरहून आलाय. त्याच्याबरोबर मिसळ खायला जायचा प्लान आहे.’ झोपेतून खाडकन जागं होतं नवरोजी विचारतील, ‘तुमच्या बॅचच्या इतर मैत्रिणी वगैरेपण असतील ना सोबत?’ मग तुम्ही सांगाल, ‘मेसेज टाकलाय तसा ग्रुप वर ….पण इतर कोणी येवो न येवो मी आणि तो ……???।
*** अनामिक. आजचा मास्टर स्ट्रोक

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here