शिस्तप्रिय राजकारणाचा आदर्श वस्तुपाठ: आधुनिक महाराष्ट्राच्या जलक्रांतीचे भगीरथ

0
358

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आणि केंद्रीय स्तरावर गृह व संरक्षण या खात्यांचे मंत्रिपद खंबीरपणे सांभाळून राज्याच्या आणि देशाच्या वाटचालीत ऐतिहासिक म्हणून नोंद झालेल्या अनेक निर्णय, प्रसंगांत मोलाची भूमिका वठवणारे दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीची सांगता १४ जुलै रोजी होत आहे. त्यानिमित्ताने, त्यांचे सुपुत्र आणि राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा लेख.. शिस्तप्रिय, वक्तशीर म्हणून ख्यात असलेल्या शंकररावांच्या व्यक्तिमत्त्व आणि कार्याचे स्मरण करणारा!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शंकरराव चव्हाण विराजमान झाले, तेव्हा मी राजकारणात नवखा होतो. शंकररावांप्रमाणेच वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार, बाळासाहेब सावंत अशा बुजुर्गांमुळे काँग्रेस पक्षाला लोकांच्या मनात मोठे स्थान होते. शंकरराव कडक आणि शिस्तप्रिय होते. त्यांचा स्वतःचा सगळ्या खात्यांचा अभ्यास होता. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

– 

– 

वसंतरावांच्या मंत्रिमंडळात मला दोन खाती देण्यात आली होती. पण शंकररावांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे घेतली आणि मला सहा खात्यांचे मंत्रिपद देण्यात आले.

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी मी सब इन्स्पेक्‍टर म्हणून काम केले होते. त्यामुळे पोलिस खात्यातील परिस्थिती मला चांगली माहिती होती. सब इन्स्पेक्‍टर निवड सुरू झाली, तेव्हा त्यांनी माझ्याकडे एक फाईल दिली आणि म्हणाले, ‘‘या निवडींमध्ये सर्व समाजांना प्रतिनिधित्व मिळते का ते पाहा.’’ मी फाईल बारकाईने वाचली. ‘शेड्युल कास्ट’मध्ये मेहतर, मातंग समाजाला स्थान मिळायला हवे, असा मुद्दा मी मांडला. तो स्वीकारण्यात आला. आपल्या मंत्रिमंडळातील सदस्याचे बलस्थान ओळखून त्याच्याकडून नेमकेपणाने काम करून घेण्याची हातोटी शंकररावांकडे होती. सगळ्यात  महत्त्वाचे म्हणजे, सगळ्या खात्यांचा आणि समस्यांचा त्यांनी अभ्यास केलेला असे. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेत उथळ बोलण्याला स्थान नव्हते.

शंकररावांची राजकारणातील सुरुवात पराजयाने झाली. इ.स. 1952 मध्ये ते हदगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार होते. अर्थात त्यावेळी शंकररावही निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक नव्हते. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठाRना त्यांनी तसे सांगितलेही होते. पण पक्षश्रेष्ठाRचा आदेश म्हणून शंकररावांनी ही निवडणूक लढविली होती. त्यावेळी हदगावचे तत्कालीन नेते माधवराव वायफनेकर यांनी बंडखोरी केली व ते शंकररावांविरुद्ध उभे राहिले. शंकररावांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.

हदगावचे अपयश ही यशाची पहिली पायरी होती, हे त्यानंतरच्या यशाने सिद्ध करून दाखविले. 1952 च्या अपयशानंतर शंकररावांना राजकारणात अपयश कधीच पहावे लागले नाही. निजामाविरुद्ध त्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामात दिलेले योगदान आणि त्यांचे विकासाचे व्हिजन यास जनतेने भरभरून प्रतिसाद देऊन 1952 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.

शंकररावांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी पाटबंधारेमंत्री म्हणून केलेले काम अतिशय महत्त्वाचे आहे. मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. येथील शेती निसर्गावर अवलंबून होती आणि वर्षानुवर्षांपासून येथील शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे खचला होता. शंकररावांनी या भागातील पाण्याच्या दुर्भिक्षाची कारणमीमांसा केली आणि शेतकऱयांच्या दुरवस्थेला पावसाचा लहरीपणा नव्हे तर पाण्याच्या नियोजनाचा अभाव हे आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढला व मराठवाडय़ात धरणे बांधण्याची योजना तयार केली व ती तंतोतंत अमलात आणली. आज जायकवाडी, विष्णुपुरीसह येलदरी, मानार, सिद्धेश्वर, पूर्णा, निम्न तेरणा, नांदुर मधमेश्वर, लेंडी, पैनगंगा आदी प्रकल्पांमुळे मराठवाडा सुजलाम् झाला आहे, त्याचे श्रेय शंकररावांना द्यावे लागेल.

जायकवाडी प्रकल्प हा शंकररावांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या प्रोजेक्टला विरोधही होता, पण हा विरोध शंकररावांनी प्रबोधनाने नष्ट केला आणि अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला. 18 ऑक्टोबर 1965 रोजी जायकवाडी प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. 2909 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या या जलसिंचन प्रकल्पामुळे संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, नगर या जिल्हय़ांतील 2 लाख 78 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली.

जलसिंचनाच्या प्रकल्पांनी महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् केला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर शंकररावांनी या प्रकल्पाच्या वितरणव्यवस्थेतही कठोरपणे सुसूत्रता आणली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शंकररावांनी राज्यातील प्रत्येक विभागासाठी एक कृषी विद्यापीठ स्थापन केले. 1972 मध्ये त्यांनी कृषी उद्योग महामंडळाची स्थापना केली.

शंकररावांनी राज्यात ज्या हिमतीने, निर्धाराने विकासकामे केली त्याची पावती काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठाRनी त्यांना केंद्रात बोलावून दिली. केंद्रातही पाटबंधारे, गृह, नियोजन आदी विभागांचे मंत्री म्हणून काम करण्याची मिळालेली संधी शंकररावांनी केंद्रातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगात आणली. शंकरराव यांना त्यांनी जलसंधारणासंदर्भात केलेल्या कामामुळे ‘महाराष्ट्रातील जलक्रांतीचे जनक’ असे संबोधले जाते.

महाराष्ट्राच्या या जलभगीरथाने केवळ राज्यच सुजलाम् सुफलाम् केले नाही तर केंद्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांनी केलेल्या जलसंपदा आणि जलसंधारणाच्या कार्याची माहिती आणि महत्त्व लोकांपर्यंत नेण्यासाठी त्यांच्या नावाचा ‘जलभूषण’ पुरस्कार राज्य शासनातर्फे यंदापासून जलसंपदा, जलसंधारण आणि पाणी पुरवठय़ाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणाऱया लोकांना देऊन गौरव करण्यात येणार आहे.

शंकररावांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. ‘कडक हेडमास्तर’ अशी त्यांची प्रतिमा होती हे खरे, पण ते अभ्यासू होते. गरिबांचे कनवाळू होते. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या बाजूचे नेते म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. दलितांना ते आपलेसे वाटत.

मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्याला आपल्या खात्याची पूर्ण माहिती असली पाहिजे, स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत, असे त्यांना वाटे. त्यामुळे ‘कॅबिनेट’मध्ये मंत्र्यांनी स्वतः मुद्दे मांडले पाहिजेत, त्याचे विश्‍लेषण केले पाहिजे, त्यावर निर्णय घेण्यासाठी पर्याय दिले पाहिजेत, अशी त्यांची भूमिका होती. कित्येक मंत्री आपल्या सचिवांवर ही जबाबदारी सोपवत असत.

प्रसंगी अशा ‘होयबा’ मंत्र्यांची कानउघाडणी करण्यास ते मागेपुढे पाहत नसत. ते बोलायला लागत, तेव्हा त्यांचा सर्वंकष अभ्यास आणि त्यांच्याकडे असलेली माहिती यामुळे आम्ही थक्क होत असू. निर्णय घेताना ‘फॅक्‍ट्‌स’बरोबर बऱ्याचदा ‘कॉमनसेन्स’चाही वापर करावा लागतो, हे त्यांनी दाखवून दिले. नंतरच्या काळात मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शंकररावांच्या मंत्रिमंडळ बैठकांची आठवण निरनिराळ्या संदर्भात येत असे. इतका त्यांचा प्रभाव होता.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विकासाचा वीस कलमी कार्यक्रम दिला होता. शंकरराव चव्हाणांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली. त्यांच्या करारीपणामुळे या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचल्या. काँग्रेस पक्षात त्यांचे विरोधक कमी नव्हते. पण त्यांच्यावर मात करून ते ‘गरिबांचे कल्याण’ हे धोरण ठेवून कार्यरत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राज्य चालवतो आहोत आणि त्यांचीच रयतेबद्दलची नीती आपण अवलंबत आहोत, ही त्यांची भूमिका होती. त्यांची कार्यपद्धती पाहिली, तर त्यात तथ्य असल्याचे जाणवते.

१९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्री झाले. तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते. काँग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नरसिंह रावांनी माझी निवड केली. शंकरराव गृहमंत्री म्हणून कौशल्याने जबाबदारी पार पाडत होते. त्याचवेळी अयोध्येतील बाबरी मशिदीचा विषय गाजला. केंद्र सरकारच्या भूमिकेवरून बरीच उलटसुलट चर्चा झाली. मी सरचिटणीस असल्याने सगळ्या गोष्टींचा जवळून साक्षीदार होतो. शंकरावांनी तत्कालिन उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध कणखर आणि सडेतोड भूमिका घेतली.

कोणत्याही कठीण प्रसंगाला न डगमगता तोंड देण्याची त्यांची वृत्ती होती. केंद्रीय गृहमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली, यात शंका नाही. चेहऱ्यावरून रागीट वाटणारे, पण दयाळू, रसिक असे शंकररावांचे व्यक्तिमत्त्व होते. नाट्यसंगीत त्यांना आवडत असे. भजनी मंडळ, वारकरी संप्रदाय, कीर्तनकार या त्यांच्या मर्मबंधातील ठेवी होत्या.

शंकररावांनी कधीही लाचारी पत्करली नाही. जे पद मिळाले ते स्वाभिमानाने टिकवण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यासारख्या मागास भागातून आलेला हा नेता केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करून गेला. शंकररावांच्या अनेकविध गुणांची, करारीपणाची आणि त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या लोककल्याणाच्या निर्णयांची आठवण माझ्या मनात अनंतकाळ राहील.
(‘आधुनिक भगीरथ’ या आगामी ग्रंथातील लेखाचा अंश.)

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here