बार्शी – राष्ट्रवादी काँग्रेसकडून बार्शी तालुक्यात पक्ष बळकटीसाठी व संघटनेच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यामुळे, नवीन युवकांना संधी देऊन तरुणांची फळी निर्माण करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आणि विधानसभेचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील युवकांना पक्षात जबाबदारी देण्यात येत आहे. नुकतेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे नेते तथा लोकनेते शुगर अनगर चे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी बार्शी तालुक्यातील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षांना निवडीचे पत्र दिले.यावेळी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बनसोडे ,बार्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश चव्हाण उपस्थित होते.

बार्शी तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी रत्नदीप प्रभाकर कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. रत्नदीप हे मूळचे शेंद्री येथील रहिवाशी असून त्यांनी कोल्हापूर येथून फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. यापुढे, एलएलबीला प्रवेश घेऊन ते वकिलीचे शिक्षण घेणार आहेत.

तसेच बार्शी शहर विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी सुरज प्रसन्न वालवडकर यांना संधी मिळाली आहे. सुरज हे पूर्वीपासूनच राष्ट्रवादी पक्षाचे काम करत आहेत. यापूर्वी, स्वर्गीय आर आर पाटील विद्यार्थी विकास प्रबोधिनी सदाशिव पेठ पुणे याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
त्यामुळेच, पक्षाने त्यांच्यावर आता बार्शी शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सुरज हे राज्यशास्त्र विषयात पदवीधर आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसने नवयुवकांना संधी देताना उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते.
