ठाकरे सरकार ‘कोरोना’च्या तिरडीवर झोपलेले सरकार – सदाभाऊ खोत
ठाकरे सरकार कोरोनाच्या तिरडीवर झोपलेले आहे, तर मंत्रिमंडळातील त्यांचे मंत्री हे क्वारंटाईन झाले आहेत”, अशी जोरदार टीका माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. एक ऑगस्टला महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यव्यापी दूधदर आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी सदाभाऊ खोत यांनी सांगितले.


कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाच्या तिरडीवर झोपलेले हे सरकार आहे. आणि मंत्रिमंडळातील त्यांचे मंत्री हे क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे” अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना केली.
“गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दूधाचा भाव योग्य मिळताना दिसत नाही. शेतकरी संघटनांकडून याबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. मात्र शासन स्तरावर काही निर्णय होताना दिसत नाही. सरकार दूध उत्पादकांना लुटणारच असेल, तर आम्ही फुकट दूध द्यायला तयार आहोत. सरकारने येऊन घेऊन जावे. पण जर सरकार जागे झाले नाही तर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरेल” असा इशाराही खोत यांनी दिला