पंचनामे करताना कोणाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या-जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
सुरत-चेन्नई महामार्गाची मोजणी 11 जुलैपर्यंत होणार पूर्ण
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

सोलापूर,: सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. 5 जून 2022 पासून जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम सर्व टीमने गतीने केल्याने अंतिम टप्प्यात असून 11 जुलै 2022 पर्यंत पूर्ण गावांतील रोव्हरद्वारे मोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सुरत-चेन्नई नवीन महामार्गाच्या मोजणीबाबतच्या आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपजिल्हाधिकारी तथा महामार्गाच्या सक्षम अधिकारी अरूणा गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक हेमंत सानप, अनिल विपत उपस्थित होते. तर वन, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख विभागाचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.
सुरत-चेन्नई हा महामार्ग ग्रीन कॉरिडॉर आहे. हा महामार्ग बार्शी तालुक्यातील 15 गावातून, दक्षिण सोलापूर चार गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील 16 अशा 35 गावातून महामार्ग जाणार होता. मात्र बार्शी तालुक्यात अजून घाणेगाव हे गाव वाढले आहे. महामार्गातील बार्शी तालुक्यातील सर्व गावाच्या जमिनीची मोजणी आज पूर्ण झाली. वाढलेल्या एका गावाची मोजणी सोमवारी पूर्ण होईल, दक्षिणमधील सर्व चारही गावांची मोजणी पूर्णण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील सहा गावांची आतापर्यंत मोजणी झाली आहे. मोजणीचे काम गतीने पूर्ण केल्याने सर्व टीमचे जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी अभिनंदन केले.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, सुरत-चेन्नई महामार्गासाठी तिन्ही तालुक्यातील जमिनीच्या मोजणीसाठी 10 रोअर मशिन देण्यात आल्या होत्या. यामुळे ही मोजणी अचूकपणे करण्यात आली आहे. तिन्ही तालुक्यातील एकूण 642.1104 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. यामुळे सर्व संबंधित विभागांनी आपापली कामे रोखपणे पार पाडावीत. संबंधित विभागांनी मोजणीच्या वेळी उपस्थित राहून काम केले आहे, जेणेकरून मोजणी सुरू असतानाच पंचनामे, मूल्यांकन करणे सोपे झाले आहे, अशी माहिती श्री. शंभरकर यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यात काम कमी झाल्याने दोन टीमद्वारे काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मोजणीच्या ठिकाणी पंचनामे, मूल्यांकन करण्यासाठी कृषी, सार्वजनिक बांधकाम, वन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पंचनामे करताना काळजी घ्या
मोजणी करताना कोणाही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या. पाईपलाईन, विहीरी फळबागा यांची माहिती घ्या. जिराईतचे क्षेत्र बागायत होता कामा नये, याची काळजी घ्या. झाडांची संख्या, इतर मालमत्ता याबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
15 जुलैपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करा
अक्कलकोट तालुका सोडला तर मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. मोजणी झालेल्या गावांचा मोजणीचा घोषवारा (जीएम शीट) प्रत्येकांनी सादर करावा. यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणने सहकार्य करावे. थ्रीडी अधिसूचना जाहीर करावयाची असल्याने सर्व विभागांनी समन्वयाने 15 जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना श्री. शंभरकर यांनी दिल्या.
12 तासांचे अंतर होणार कमी
सुरत-चेन्नई हे अंतर 1290 किमी असून हे अंतर जाण्यासाठी 30 तास लागत होते. या महामार्गामुळे आता 18 तासात हे अंतर पार होणार आहे. 8200 कोटींचा हा प्रकल्प असून महामार्गामुळे स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. जमिनींच्या किंमती वाढून मिळणार आहेत.