वाढदिवस विशेष: गुणात्मक कामगिरीवर संसदेत स्वतःला सिध्द करणाऱ्या सुप्रिया सुळे; वाचावे असे काहीतरी

0
434

काही दिवसांपूर्वी संसदरत्न, संसद महारत्न वगैरे वगैरे पुरस्कारांची घोषणा झाली. खासदारांनी संसदेत विचारलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग याच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात. खासदारांची संसदीय कामकाजातील सक्रीयता एवढ्या एका निकषावर त्याला महत्त्व असतं. पण ते तेवढ्यापुरतंच.

कारण बॅरिस्टर नाथ पै, मधू दंडवते, मधु लिमये, जॉर्ज फर्नांडिस अशी संसद गाजवणारी एकाहून एक सरस मराठी नावं आहेत आणि त्यांना कधी कुणी रत्न किंवा महारत्न यासारख्या विनोदी किताबांनी गौरवलेलं नव्हतं. कुणाला कमी लेखन्याचा प्रश्न नाही, परंतु संसदीय पातळीवर संख्यात्मक कामगिरीपेक्षा गुणात्मक कामगिरी अधिक महत्त्वाची असते. त्या निकषावर अलीकडच्या काळात स्वतःला सिद्ध केलं आहे ते महाराष्ट्रातील फक्त सुप्रिया सुळे यांनी !

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुप्रिया सुळे गेली तेरा वर्षे संसदेत आहेत, त्यामुळं विचारलेल्या प्रश्नांची संख्या आणि संसदरत्नसारखे पुरस्कार हा त्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनाचा मापदंड ठरु शकत नाही. शरद पवारांच्या कन्या म्हणून आजही त्यांची ओळख आहे. ही ओळख अभिमानानं मिरवण्यासारखी असली तरी त्यापलीकडं त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील गंभीर विषयांवर त्या जी मांडणी करतात, तशी मांडणी महाराष्ट्रातले कुणी खासदार करताना दिसत नाहीत.

उदाहरण द्यायचं झालं तर लोकसभेतील ३७०कलमावरील चर्चेचं आणि CAB वरील चर्चेचं देता येईल. या दोन्ही विषयांवेळी लोकसभेत जी उत्तम भाषणं झाली त्यात सुप्रिया सुळे यांच्या भाषणांचा आवर्जून समावेश करावा लागेल.

३७० कलमाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं मतदान केल्याचा खोटा आरोप अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक प्रचारात केला होता. प्रत्यक्षात राष्ट्रवादीनं त्यावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. सुप्रिया सुळे यांच्या भाषणाचा आशय मात्र ३७० कलमाच्या थेट विरोधातला होता. काश्मीरमधील सद्यस्थिती, वर्तमान स्थिती, भूतकाळातले दाखले देत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

त्या बोलत असताना सत्ताधारी सदस्य व्यत्यय आणू लागले तेव्हा त्यांनी संबंधितांना खडसावलेही. कुणीतरी मध्ये काही बोललं त्यावर म्हणाल्या, ‘मी सिरिअसच बोलते. माझे रेकॉर्ड चेक करून बघा. आज नाही, गेल्या तेरा वर्षांचे…’ त्यांनी झापल्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनीही आपल्या सदस्यांना हाताने इशारा करून शांत राहायला सांगितले होते.भाजपच्या हुल्लडबाजी करणा-या सदस्यांच्या गर्दीपुढं एवढं आत्मविश्वासपूर्ण भाषण करणं ही साधी गोष्ट नाही.

CAB वरील भाषणाची सुरुवातच त्यांनी मार्टिन निलोमर यांच्या,”First they came for the Communists, and I did not speak out—because I was not a Communist,” या कवितेनं केली. देशात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या समाजाला असुरक्षित वाटतंय. कृपया स्वतःच्या देशात कुणाला स्टेटलेस बनवू नका, अशी कळकळीची विनंती करून त्यांनी भाषण संपवलं होतं.(ही दोन्ही भाषणं यू ट्यूबवर उपलब्ध असून आवर्जून ऐकण्यासारखी आहेत.)

अलीकडच्या काळात संसदेत चांगली भाषणं दुर्मिळ झाली आहेत. महाराष्ट्रातील खासदारांच्या इंग्रजी, हिंदी भाषणांमध्ये प्रवाहीपणा नसतो. स्थानिक प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. परंतु राष्ट्रीय प्रश्नांचं खोल आकलन नसतं. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेली ही हिंदी आणि इंग्रजीतली भाषणं प्रभावी ठरली. भूमिकेतली स्पष्टता हे त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य. ही दोन्ही भाषणं २०१९ मधल्या बेस्ट भाषणांपैकी होती. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकीर्दीचं मूल्यमापन कधीही करायचं झालं तरी देशाच्या इतिहासातील या दोन ऐतिहासिक घटनांच्यावेळी त्यांनी केलेली भाषणं विचारात घ्यावी लागतील.

सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाची भविष्यातील दिशा काय असेल, याचा आजघडीला काहीच अंदाज बांधता येत नाहीत. त्या दिल्लीतच राजकारण करणार की महाराष्ट्राच्या राजकारणात येणार याचं उत्तर काळच देईल.

चीनच्या प्रश्नावर शरद पवार यांनी आपल्या समर्थकांना संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले असले तरी सुप्रिया सुळे यांना खासगीत विचारले तर त्या राहुल गांधी यांच्या भूमिकेचंच समर्थन करतील. एवढी स्पष्टता त्यांच्या विचारात आहे. (अनेकदा नेत्यांच्या, पक्षाच्या भूमिकेवर मौन पाळावं लागतं.)

आज त्यांचा पन्नासावा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

  • विजय चोरमारे ज्येष्ठ संपादक यांच्या फेसबुकवरून साभार

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here