सोलापूर,दि.३० : ग्रामीण पोलीस दलाच्या विशेष पथकाने सव्वा कोटी रुपयांची अवैध वाळू व वाहने जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. विशेष पथकाला माळशिरस तालुक्यातील कन्हेर येथील ओढ्यामधून वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पथकाने छापा टाकला असता एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर, सात ब्रास वाळू असा एकूण ३५ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ५ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विशेष पथकाला करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे भीमा नदीमधून यांत्रिक बोटीने वाळू उपसा चालू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ३ हायवा ट्रक, १६ ब्रास वाळू असा एकूण ६६ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी जप्त मुद्देमाल करमाळा पोलीस ठाण्यात देण्यात आला असून पाच आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

विशेष पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावाजवळ शेतामध्ये हातभट्टी दारू तयार करण्याच्या केंद्रावर छापा टाकला. यावेळी ३७ हजार ८०० लीटर रसायन , १६०० लीटर मळी, १३०० लीटर हातभट्टी दारू असा ९ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ५ आरोपींविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही सातपुते यांनी सांगितले.