यशकथा:पंढरपूर तालुक्यातील झाडांवर प्रेम करणारे चिंचणी गाव ; गावांमध्ये प्रति महाबळेश्वरचा भास; वाचा सविस्तर-
-पंढरपुरातील पुनर्वसित गाव झाडांनी समृद्ध
-गावांमध्ये प्रति महाबळेश्वरचा भास
-माळरानावर उभारली सात हजार झाडे
सोलापूर : गावात पाऊल टाकताच जिकडे तिकडे हिरवाईने नटलेला परिसर, फळ वृक्षांपासून ते सावली देणारी असंख्य झाडे, सेंद्रीय शेतीचा प्रयोग, घरावरील छताच्या पाण्याचे रेन वॅाटर हार्वेस्टिंग करणारं, गावात फटाक्यांना बंदी, झाडांसाठी वाटेल तो प्रयोग करणारे, असे झाडावर प्रेम करणारे एक गाव चर्चेत आले आहे. झाडांनी समृद्ध असलेल्या या गावची ओळख येथील झाडेच आहेत. ‘झाडांचे गाव’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या गावचे नाव चिंचणी असं आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्ती अभियानात पहिल्याच वर्षी चिंचणीने भाग घेतला.जिल्ह्यातलं पहिलं ‘हागणदारीमुक्त गाव’ म्हणून यापूर्वीच या गावाने ओळख निर्माण केली होती. आता हेच गाव झाडांचे गाव म्हणून नावारुपास येत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामध्ये चिंचणी हे पुनर्वसित गाव. गावात साधारणतः ६५ कुटुंबे. जेमतेम ३७५ इतकी गावची लोकसंख्या. सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर १९७८ साली चिंचणी गावाचे पुनर्वसन झाले. सोलापूर जिल्ह्यात पिराची कुरोली (ता. पंढरपूर) येथील भाग या ठिकाणच्या ओसाड माळरानाची जमीन गावकऱ्यांच्या वाट्याला आली. टप्पा हे वारकऱ्यांसाठी श्रद्धा आणि आदराचे स्थान असल्याने मोठ्या श्रद्धेने ग्रामस्थांनी या जागेला पसंती दाखवली. पुनर्वसनात प्रत्येक कुटुंबाला दोन एकर शेती मिळाली.

महाबळेश्वरच्या पायथ्याला हिरवाईने नटलेलं निसर्गसंपन्न चिंचणी गाव आपल्या मूळच्या गावाप्रमाणेच हा परिसर नव्याने उभारण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. सन २००६ नंतर खऱ्या अर्थाने दुसऱ्या पिढीने गावचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांचं मार्गदर्शन घेतलं.चिंचणीमध्ये प्रति महाबळेश्वर उभारण्याचा गावाने चंग बांधला. सर्व ग्रामस्थांनी मिळून रिकाम्या जागा पाहून झाडे लावण्यास सुरुवात केली.
पाहता पाहता गावात सात हजारांवरून अधिक झाडे लोकसहभागातून लावली आणि ती जगवली.आजही ही झाडे मोठ्या दिमाखात उभी आहेत. गावातील प्रत्येकाच्या दारासमोर झाडे पाहायला मिळतात. आंबा, नारळ, चिकू, पेरू, सिताफळ, बोर, अशी फळवृक्ष लावली आहेत. प्रत्येक सीझनमध्ये गोड फळे मिळतात. यातले कुठलेही फळ विकले जात नाही. याशिवाय सावली देणारे कडुलिंब, चिंच तसेच काही वनऔषधी अरे जंगली झाडेदेखील ट्री गार्ड विना लावली आहेत. झाडांना ठिबक सिंचन केले अाहे.

ग्रामस्थांसाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असून पाच रुपयांमध्ये वीस लीटर शुध्द पिण्याचे पाणी दिले जाते. कुटुंबांनी आपापल्या घरावरील छताचे पाणी संकलित करून ते जमिनीत जिरवले आहे. या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे तीन लाख कोटी लीटर पाणी भूगर्भात मुरते आहे. या गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे. बरेच शेतकरी शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. प्रत्येक शेतकर्यांचा सेंद्रिय शेती करण्यावर जास्त भर असतो.

एकमताने घेतात निर्णय
पिराचीकुरोली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत पुनर्वसित चिंचणीचा समावेश होतो. चिंचणीचा स्वतंत्र वॉर्ड आहे. त्यातून तीन सदस्य निवडून देता येतात. मात्र गावकऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले नाही. जाणीवपूर्वक राजकारण आणि निवडणुकांपासून दूर राहणे पसंत केले. जे करायचं ते स्वयंफूर्तीने व एकमेकांच्या विचाराने असं ठरवण्यात आलं.

फटाक्यांवर बंदी
गावांमध्ये हिरवीगार गर्द झाडी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पक्षी वावरत असतात. फटाके फोडल्याने त्याचा त्रास पक्ष्यांना होऊ शकतो. हे लक्षात घेऊन या गावात फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळी दसरा लग्न समारंभ वाढदिवस अशा कार्यक्रमात गेल्या तीन वर्षांपासून गावात फटाके फोडले जात नाहीत.
आणि या छोट्या छोट्या जागृतीमधूनच अख्या चिंचणी गावालाच कृषी पर्यटन गाव म्हणून विकसित करता येतं का? या विचारातूनच गावकऱ्यांनी,
महाराष्ट्र राज्यातलं पहिलंवाहिलं कृषी पर्यटन गाव बनवण्यासाठी कंबर कसली आहे.
असं हे चिंचणी गाव सह्याद्रीच्या हिरव्यागार कड्या कपारीतून तुटलेलं. निसर्गाशी, प्राणी मात्रांशी, पशु पक्षांशी पुरातन मैत्री असलेल समृध्द असं गाव. धरणामुळे मुळातून उखडून दुष्काळी भागात कायमचं विस्थापित झालं.
या गावच्या पहिल्या दोन पिढ्या या दुष्काळात होरपळल्या, पण नव्या पिढीनं आपल्या मुळाचा शोध घेत घेत धरणामूळ उध्वस्त झालेलं जुनं गाव नव्याने “प्रति महाबळेश्वर व कृषी पर्यटन गाव” म्हणून उभा करण्याचा निर्धार केला आहे.
साऱ्या चिंचणी गावान एक ध्यास, नवं स्वप्न उराशी बाळगून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळातील डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारी हिरवळ अपार कष्ट आणि मेहनतीतुन उभी करून, “हिरवळीच गाव, झाडाच्या गर्दीत गुडूप झालेलं गाव अन जणू प्रतिमहाबळेश्वरचं” अशी नव्याने निर्माण केलेली ओळख व घेतलेली झेप नक्कीच सर्वांना ऊर्जा निर्माण करणारी आहे.
कोट
आदर्श गाव म्हणून उदयास येईल
लोकसहभागामुळे आमच्या गावात सहा ते सात हजार झाडे लावणे शक्य झाले .गावातील तरुणांना येथेच उद्योग उभा करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी भविष्यात कृषी पर्यटन केंद्रावर भर देणार आहोत. आदर्श गाव म्हणून आमचे गाव लवकरच पुढे येईल.
-मोहन अनपट, ग्रामस्थ, चिंचणी