बार्शी : हप्ता देण्यास नकार दिल्याने दमदाटी शिवीगाळ करत मोबाईल दुकानदाराला मारहाण केल्याची घटना बार्शी शहरात घडली.
याबाबतची माहिती अशी की, बुधवार दि. ६ एप्रिल २०२२ रोजी येथील आझाद चौकातील, जितेंद्र मोबी वर्ल्ड या मोबाईलच्या दुकानात मालक जितेंद्र चंदनमल ललवाणी (वय ३७) व त्याचा भाऊ हितेश ललवाणी (दोघेही रा. रोडगा रस्ता, बार्शी) व्यवसाय करत असताना बिट्ट्या उर्फ हर्षल होनराव, सुभाष नगर, बार्शी हा तेथे आला, आणि तुम्हाला येथे धंदा करायचा असेल तर मला हप्त्याचे स्वरुपात पैसे किंवा मोबाईल आणि मोबाईलचे अॅक्सेसरीज फुकट द्यावे लागतील असे म्हणू लागला.
ललवाणी बंधूंनी त्यांस नकार दिला असता, त्याने अंगावर धावून जात शिवीगाळी केली. तसेच दुकानाचे बाहेर गेल्यानंतर त्याने ललवाणीच्या वडिलांना कानाखाली चापट मारली.
त्यावेळी हे दोघे भाऊ सोडविण्यासाठी गेले असता, होनरावने त्याचे हातातील कड्याने जितेंद्रच्या डाव्या डोळयाजवळ व कानावर मारहाण केली. तसेच गळयावर, हातावर नखाने ओरखाडून जखमी केले. त्याचा भाऊ हितेश यालाही लाथाबुक्क्याने मारहाण केली.
आणि मी उद्या परत येऊन पैसे मागणार आणि नाही दिले तर पुन्हा शिवीगाळी करुन मारहाण करणार अशी दमदाटी करुन निघून गेला. अशी तक्रार जितेंद्र ललवाणी याने हर्षल होनराव याचे विरुध्द बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
