साडी फेडणं लय सोप्प असतंय.
वर्षात 8,760 तास असतात. त्यातल्या चार तासासाठी मी दरवर्षी साडी नेसतो. खरच. विश्वास बसत नसेल तर माझ्या गाववाल्यांना विचारा. हो, पुर्ण गावाला हे माहितीये. कारण मी साडी घालून सार्या गावासमोर नाचतो. दरवर्षी गुढीपाडव्याला आमच्या गावात यात्रा असते आणि त्या यात्रेत सोंगाचा कार्यक्रम असतो.

त्यामध्ये प्रत्येक घरामध्ये रुढीपरंपरेनुसार चालत आलेली सोंगे असतात. सोंगे म्हणजे अॅक्ट. लाईक ड्रामा. रामलीलाचा कार्यक्रम कसा असतो, सेम तसाच. या सोंगाच्या कार्यक्रमात माझा सीतेचा रोल असतो. डायलॉग वगैरे काही नसतात. फक्त साडी घालून भर चौकात नाचायचे.
समोर दोन-तीन हजार लोक बसलेले असतात. तुमच्याकडं एकटक पाहत असतात. गावातल्या सुंदर पोरी असतात. आपण, शाळेत असताना ज्यांच्यावर लाईन मारायचो, त्या पोरी माहेरी आलेल्या असतात. शिवाय शहराकडच्या सुंदर सुंदर पाहुण्याही आलेल्या असतातच. हे कमी की काय, आपले बालमित्रही असतात.
त्यांच्यासमोर साडी घालून नाचायचे म्हणजे फाटायची कामे असतात. पण, खरी धडकी भरते ती बाई होताना. कारण, फक्त साडी नसते, तर परकर, ब्रा, झंपर, विग, गळ्यातले दागिने, हातातले दागिने, मेकअप, काजळ, कुंकू, नेलपेंट, चाळ, बाजुबंद, बांगड्या, नथ, अंगठी, गजरा, लिपस्टिक, लिपग्लॉस, आयलायनर असा सगळा साजशृंगार असतो, हा सर्व शृंगार करुन हजारो लोकांच्या नजरा झेलत चौकात येणं म्हणजे स्वत:च्या शरीरातल्या आणि मनातल्याही स्त्रीचा जन्म असतो.
घट्ट बसलेला झंपर आपलेच मित्र न्याहाळतात, तेव्हा मला लाज वाटते. कारण माझ्या मनातल्या स्त्रीचा जन्म झालेला असतो.
कुणीतरी जवळचा मित्र येऊन माझे कृत्रिम स्तन बिनधास्त दाबतो. तो स्पर्श माझ्या शरीराला होत नाही. पण, माझ्या मनाला होतो. कारण माझ्या मनातल्या स्त्रीचा जन्म झालेला असतो.

चौकात नाचताना पेताड लोक धुंद होऊन माझी कंबर न्याहाळतात, तेव्हा मी अस्वस्थ होतो. कारण माझ्या मनातल्या स्त्रीचा जन्म झालेला असतो.
मी पुरुष आहे माहिती असूनही केवळ साडी नेसली म्हणून कुणीतरी मला खेटून चालतं आणि मला ते बरोबर जाणवतं, कारण माझ्या मनातल्या स्त्रीचा जन्म झालेला असतो.
माल, सामान, आयटम, कटपीस हे शब्द तेव्हा काट्यासारखे टोचतात… कंबर, पाय, पाठ, छाती, पोट काही विचित्र तर दिसत नाही ना, हे वारंवार पहावं लागतं…
कधी ही साडी काढून फेकून देईल आणि साधे कपडे घालेल असं सतत वाटतं.
तरीही आपली संस्कृती सांभाळत मला ते नेसावं लागतं…
कुणी काही बोललं तरी मला सगळ्यांच मन सांभाळावं लागतं.कारण माझ्या मनातल्या स्त्रीचा जन्म झालेला असतो.
आई, बहिण, बायको मुलगी खुप ग्रेट आहे असे वाटत असेल आणि खरोखरच मुलींचा सन्मान करत असाल तर संपुर्ण वर्षातले फक्त चार तास घरामध्ये साडी नेसून पहा. शरीराने पुरुष राहिला तरी चालेल चार तास मनाने स्त्री होऊन पहा.
मुलींविषयीचा प्रचंड रिस्पेक्ट वाढेल.
बाईच सौंदर्य साडीतच खुलतं असं म्हणत मिशीवर ताव मारण्यापेक्षा एकदा ती साडी नेसुन त्याच बाईच मन समजून बघा. जग जिंकल्याचा आनंद होईल.
कारण, साडी फेडणं लय सोप्प असतं. नेसायला दम लागतो.