सारथी बैठक: छत्रपती संभाजी महाराज आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं वाचा….!
खासदार छत्रपती संभाजी राजेंनी कोणत्याही परिस्थितीत सारथी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन स्वतः मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर घडलेल्या अनेक घडामोडीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी स्वतः राजेंना फोन करून आपल्या शिष्टमंडळाला बरोबर घेऊन भेटण्यासाठी मुंबईला बोलावले होते. या बैठकीच्यावेळी घडलेल्या घटनेचा आढावा छत्रपती संभाजी राजेंचे अत्यन्त विश्वासू समजले जाणारे केदार योगेश यांनी आपल्या फेसबुक अकाउनवरून शेअर केला आहे.

नाण्याची दुसरी बाजू!
छत्रपती संभाजीराजेंचा अपमान! अजितदादा पवार, बैठक आणि सर्व काही….मंत्रालयात सारथी संदर्भातील गोंधळ पडद्या समोरच्या आणि पडद्या मागच्या गोष्टी.
काल काही लोकांनी सभागृहात राजे कसे उशिरा आले आणि वेळेचे बंधन पाळणाऱ्या उपमुख्यमंत्री पवारांनी, सगळ्या गोष्टी कश्या प्रामाणिकपणे केल्या, कुणी गोंधळ घातला हे सांगण्याचा हेतू पुरस्सर प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राला त्याही पेक्षा पुढच्या चार गोष्टी माहीत असणे गरजेचे म्हणून हा लेख प्रपंच.

या सर्व प्रकरणाची सुरुवात ही मंत्री विजय वडेट्टीवरांनी उभ्या केलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा विवादावर राजेंनी केलेल्या ट्विट आणि फेसबुक पोस्ट नंतर सुरू झाला. सारथी संदर्भात आलेलं अपयश लपवण्यासाठी जातीचा घेतलेला आधार आणि त्यानंतर समाजात उमटलेले तीव्र पडसाद, हे प्रकरण अंगलट येत असलेलं बघून मंत्री वडेट्टीवारांनी अजित दादांनी भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संभाजीराजेंशी संपर्क केला. आणी पवारांचा सारथी प्रकरणात प्रवेश झाला.
मराठा समाजातील काही निवडक 5 लोक घेऊन बैठकीला मुंबईला या, यातून काहीतरी तोडगा काढू असं अजितदादा पवार म्हणाले. मराठा क्रांती मोर्चासाठी शेकडो समाजसेवकांनी योगदान दिले आहे. सारथी साठीही असंख्य समन्वयकांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सारथी च्या बाजूने भूमिका घेतली होती. मग नेमकं कुणाला घ्यायचं आणि कुणाला नाही? एकाला घेतलं की दुसरा नाराज होणार. हा पेच समोर उभा राहिला. एखादा समन्वयक नाराज झाला की मला का नाही बोलावलं, यावरून चुकीचे विधान करण्याची शक्यता होती. आणि विषयाला वेगळं वळण लागण्याची भीती सुद्धा होती.

त्यामूळे राजेंनी अजितदादा पवारांच्या कार्यालयाला कळवायला सांगितलं, की आपणच ठरवा कुणा कुणाला बोलवायच ते. मी मिटींगला येतो असा निरोप राजेंच्या कडून देण्यात आला. तसेच कोवीड मूळे सर्वांना या चर्चेला बोलवता येत नसले, तरी व्हीडीओ काँन्फरन्स द्वारे मराठा समन्वयकांना या चर्चेत सहभागी करुन घेण्यात यावे, अशी सुचना राजेंनी त्यांना केली. व ती मान्य ही करण्यात आली. (पण मान्य केल्याप्रमाणे कुणालाही व्हिडिओ कॉन्फरन्स वर घेतलं गेलं नाही, हे ही सत्य आहे)
परत दुसऱ्या दिवशी फोन आला की, राजे आणि त्यांच्यासोबत एकाच व्यक्तीला परवानगी मिळेल. त्यापेक्षा जास्त लोक आणू नका. जर जास्त लोक आले तर मी सर्व अधिकारी बैठकीत न घेता कॉन्फरन्स वर घेईन. तिथे राजेंनी त्या सचिवालय तेवढ्यात खडसावले की, तुम्ही प्रत्येक वेळी बदलून का बोलत आहेत? दादांनी सांगितलं या, म्हणून मी येतोय. तुम्ही अश्यपद्धतीने बोलायची आवश्यकता नव्हती. संतापाच्या भरात काही वेळा करिता राजेंनी ठरवलं की आपण बैठकीला जायचंच नाही. पुन्हा हा विचार केला आणि आम्हाला सांगितला की आपण जाऊ लोकांचा मुद्दा मार्गी लागला पाहिजे. आपल्यापेक्षा गरिबांचे हित जास्त महत्वाचे आहे.

म्हणजे राजेंचा अपमान करायची सुरुवात ही एक दिवस आधी पासूनच झालेली होती, हे लक्षात घ्या.
काहीवेळाने शासनाने पत्रक काढलं त्यात काही ठराविक नावे होती. तसेच त्यांनी राजेंच्या बरोबर ४ लोक आणण्यासाठी परवानगी असल्याचे फोनवरून कळवले. कोल्हापूर ते मुंबई प्रवास करून 8 वाजता मुंबई मध्ये पोचलो. कुठलेही हॉटेल उघडे नव्हते. एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्रालयातील कार्यालयात सकाळी 10 च्या नंतर तयार होण्यासाठी जागा मिळणार होती. अक्षरशः आम्ही गाडी च्या खाली न उतरता सव्वा दहा पर्यंत मंत्रालायजवळ बसलेलो होतो.
त्यानंतर मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केला. शिंदे साहेबांच्या शिपायाला यायला उशीर होत होता. मग आम्ही तसेच हसन मुश्रीफ साहेबांच्या दालनात गेलो. पावणे अकरा झाले होते तोपर्यंत. राजे आणि आम्हाला तयार होऊन वर निघालो अन आम्ही बरोबर 11 वाजून 7 मिनिटाला सभागृहात पोचलो.

राजेंनी सभागृहात प्रवेश केला. सभागृह भरलेले होते.(खरं म्हणजे यात मराठा समाजातील योगदान देणारे समन्वयक कमी अन जागा भरण्यासाठी आणून बसवलेले लोक जास्त होते) राजेंना तिसऱ्या ओळीत शिल्लक जागा दिसली. आणि ते तिथे जाऊन बसले.
राजेंनी तिसऱ्या ओळीत बसने नाशिक चे मराठा क्रांती समन्वयक करण गायकर यांना पसंद पडले नाही. त्यांनी थेट दादांना प्रश्न केला. की महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपतींचे वंशज येणार आहेत हे माहिती असूनही तुम्ही त्यांच्या बसण्याची व्यवस्था केली नाही. तुम्ही संभाजीराजेंना मंचावर बसवण्याची व्यवस्था करायला पाहिजे होती. हे तुम्ही ठीक केले नाही. तुम्ही वरती आणि आमचे राजे खाली? हे समाजाला कळलं आणि त्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही काय उत्तर देणार? त्यात धनंजय जाधव जे मराठा क्रांती मोर्चामध्ये नेहमी सक्रिय असतात.

पुण्याचा मराठा क्रांती मोरच्यांच्या सर्व परवानग्या त्यांच्याच नावाने होत्या. त्यांनी सुद्धा या प्रकरणात उडी घेतली. अजित दादांनी मोठ्या आवाजात(जो त्यांचा स्वभाव आहे) सांगितलं की तू शिकवू नको. मला माहिती आहे कुणाला कुठं बसवायचं ते. संसदेत राजे कुठे बसतात?(वास्तवात दादांना हे चांगले माहिती आहे की, सभागृहात नवख्या सदस्यांना मागेच बसावं लागतं, ती पद्धत आहे कार्यकाळ दुसऱ्या टर्म ला थोडं पुढं असं ते असतं) मग करण गायकर म्हणाले की ती संसद आहे, तिथे बसवण्याची वेगळी पद्धत असेल. पण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे.

महाराष्ट्रात छत्रपती हे सर्वात मोठे. तुम्ही वर आणि आमचे राजे खाली हे चालणार नाही. त्यांना तुम्ही मांचावरच बसवले पाहिजे. एवढ्या मोठ्या मंचावर तुम्ही आधीच खुर्ची राखीव ठेवायला पाहिजे होती. तीन ऐवजी 4 झाल्या तर काय बिघडलं? राजे यायच्या आधी मी तुमच्या सचिवाला बोललो सुद्धा होतो.
तरीही अजित दादा म्हणाले, संभाजी राजे तुम्ही समोरच्या ओळीत पहिल्या रांगेत बसा. जिथे आधीच विनायक मेटे आणि विनोद पाटील बसले होते. विनायक मेटे उठून उजवी कडे सरकले. तिसऱ्या रांगेत बसलेल्या राजेंनी उठण्यास नकार दिला. करण गायकरांनी अजितदादा पवारांना चांगलेच धारेवर धरले.
मग मी म्हणालो, की हे वडेट्टीवार मंत्री ज्यांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं ते मंचावर आणि ज्यांनी समाजासाठी इतक्या खस्ता खाल्ल्या ते खाली? हे जमणार नाही. मग वडेट्टीवार चिडून खाली उतरले. त्या रिकाम्या झालेल्या खुर्चीवर बसायला राजेंना अजित दादांनी बोलावलं. राजेंनी त्या गोष्टीला नकार दिला. इतर लोकांनी सुद्धा आवाज उठवला. विनायक मेटे आणि विनोद पाटील हे ही उभे राहिले.
या समन्वयकांना राजेंनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की, मी कुठेही बसलो तरी फरक पडत नाही. आपण समाजाच्या कामासाठी आलोय. ते करणं जास्त महत्वाचं आहे. तरीही गोंधळ थांबत नव्हता.
मग उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले मीच खाली येतो. तुमच्या राजेंना इथे बसा म्हणा. त्या गोंधळात सुद्धा राजे अजितदादांना म्हणाले की, मला इथे बसायला काहीच अडचण नाही. तुम्ही सभा सुरू ठेवा. पण एक लक्षात राहू द्या, मागच्या दोन दिवसांपासून तुम्ही माझा अपमान करत आहात. तुमच्या सचिवांनी माझ्याशी उद्धट भाषेत फोन वर भाषा केली. आधी ज्या मराठा समन्वयकांना घेऊन या म्हणून तुम्हीच निरोप दिला.
त्यांना त्यानंतर येऊ नका म्हणून सांगितलं. ज्यांना मी शब्द दिला होता ती लोकं नाराज होतील माझं नुकसान होईल याचा विचार केला नाही. तुम्ही अनेक मराठा समनव्याकांचे नाव सुद्धा घेतले नाही, ज्यांनी सारथी साठी आंदोलन केलं,
ज्यांनी सारथी करिता सतत पाठपुरावा केला. तरीही मी सहन केलं. इथपर्यंत आलो. कारण मला माझ्यापेक्षा समाज महत्वाचा होता. परत राजेंनी धनंजय जाधव आणि करण गायकर ला समजावलं की, मी इथे बसलो म्हणून काहीही फरक पडणार नाही. तुम्ही शांत बसा. हा माझा आदेश आहे.
मग दादांना परिस्थिती चं गंभीर्य लक्षात आलं. त्यांनी त्या सचिवाला विचारलं, तू संभाजीराजेंना तसं का बोललास? राजेंची माफी मागायला सांगितली. त्या सचिवांनी माफी सुद्धा मागितली. ते सर्व सभागृहाने बघितलं. त्यानंतर काही शांतता आली.
कार्यवाही सुरू झाली. अजितदादा पवारांनी भूमिका मांडली त्यानंतर सर्वजण बोलत होते. राजेंद्र कोंढरे, वीरेंद्र पवार, विनोद पाटील, विनायक मेटे, गंगाधर बनबरे, करण गायकर, धनंजय जाधव, ऍड पाटील यांनी मते मांडली.
तोपर्यंत या संपूर्ण गोंधळातील काही व्हिडीओ बाहेर व्हायरल झाले होते. सगळीकडे ब्रेकिंग न्यूज लागली. महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू लागले. सोशल मिडीयावर सर्वांकडून आक्रमकपणे निषेध व्यक्त होऊ लागला. हे अजितदादा पवारांना कुणीतरी चिट्टी देऊन सांगितले.
जेंव्हा राजें बोलायला उठले तेंव्हा, अजित पवार थेट उठले. राजे तुम्ही आत्ता बोलू नका. आपण आत मध्ये चर्चा करू. राजे म्हणाले मी आत मध्ये का बोलू? मी समाजाच्या समोर बोलतो. तरीही अजित पवार उठून खाली आले. राजेंना बोलू न देण्याचा प्रकारही समन्वयकांना आवडला नाही. परत खटके उडाले. अजित पवारांनी खाली येऊन राजेंना कॉन्फरन्स रूम मध्ये येण्याची विनंती केली. आणि हे सांगितलं की संभाजी राजे, विनोद पाटील, विनायक मेटे, राजेंद्र कोंढरे यांनीच कॉन्फरन्स रूम ला यायचं.
राजेंनी पुन्हा मनाचा मोठेपणा दाखवत काँन्फरन्स रुममध्ये चर्चेसाठी जायचे ठरवले. हॉल च्या बाहेर पत्रकार होतेच. त्यांनी आत मध्ये काय घडलं याविषयी विचारणा केली. आपला अपमान केला गेला, मीटिंग अर्धवट झाली, आपली प्रतिक्रिया काय? राजेंनी यावर सांगितले की मी आत्ताच काही बोलणार नाही. तिकडे काय घडतं हे बघू. त्यानंतर बोलेन.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा राग जास्तच वाढला होता. त्यांनी बाहेर मीडियाला येऊन सर्व हकीकत सांगितली. संपूर्ण महाराष्ट्रात राजेंना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीवरून एकच गहजब झाला. आपल्या छत्रपतींचा अपमान कुणालाही सहन झाला नाहीं. सगळीकडे तीव्र निषेधाच्या बातम्या येऊ लागल्या. त्या दबावापोटी अजितदादा पवारांनी तात्काळ निर्णय निर्णय घेतले. संपूर्ण ताकद झोकून समाजाच्या मागण्या लगेच मान्य केल्या.
राजेंच्या मनाचं मोठेपण दोन कृतीतून स्पष्टपणे दिसत होते. १) अपमान होऊन सुद्धा ते समाजासाठी स्वतः कमीपणा घेऊन लोकांमध्ये बसून राहिले. माझ्या दृष्टीकोनातून त्याहीपेक्षा राजेंच्या मनाचा मोठेपणा हा दुसरा आहे. २)अजितदादा पवारांच शेवटी त्यांनी कौतुकच केलं.
कारण त्यांनी समाजासाठी काही निर्णय घेतले होते.
स्वतः च्या मान अपमानापेक्षा समाजाचं काम महत्वाचं राजेंनी बोलण्या वागण्यात कुठेही फरक येऊ दिला नाही. स्वतःचा मोठेपणा त्यांनी जराही आड येऊ दिला नाही. त्यांनी पुन्हा सिद्ध केलं की ते खरे शिव शाहूंचे वंशज आहेत. मान अपमानाचा पुढे गेलेलं हे व्यक्तिमत्व उभ्या महाराष्ट्राने पाहिलं.
योगेश केदार
मावळा छत्रपतींचा