कारीच्या सरपंच पदी निलम कदम तर उपसरपंचपदी खासेराव विधाते
कारी: उस्मानाबाद तालुक्यातील कारी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीच्या निलम अनिल कदम तर उपसरपंचपदी खासेराव विधाते यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागा जिंकत तुळजाभवानी ग्रामविकास आघाडीने सत्ता काबीज केली.

मंगळवार (दि.९ ) रोजी येथिल सरपंच व उपसरपंच निवडीसाठी प्रक्रिया पार पडली. सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यानुसार येथील निलम अनिल कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपसरपंचपदी खासेराव विधाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या निवड प्रक्रियेत सरपंच पदासाठी निलम अनिल कदम यांचा तर उपसरपंच पदासाठी खासेराव विनायक विधाते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे दोघांच्याही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आली.

यावेळी अध्यासी अधिकारी प्रवीणकुमार शिंदे यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी ग्रामसेवक एस. आर पवार, तलाठी पडवळ यांच्यासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.