टेंभुर्णी: टेंभुर्णी शहरातील महादेव गल्ली येथे मंगळवारी रात्री कामावरून घरी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघांनी धूम स्टाईलने चोरून पोबाराकेला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वा. सुमारास घडली.

याबाबत टेंभूर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, सरला शशिकांत गायकवाड (वय ४९) रा. टिळक रोड, टेंभुर्णी या मंगळवारी रात्री ८.०० वा. सुमारास कामावरून घरी जात होत्या. त्या महादेव गल्लीतील महादेव मंदिरासमोरून जात असताना त्यांच्या समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सात ग्रॅम वजनाचे व २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणीमंगळसूत्र क्षणात हिसका मारून
चोरून नेले.

यावेळी सरला गायकवाड यांनी आरडाओरड केली. मात्र काही वेळातच ते चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. याबाबत टेंभूर्णी पोलीस ठाण्यात सरला शशिकांत गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा
दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोनि सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट
दिली. या घटनेचा अधिक तपास सपोनि गिरीश जोग हे करीत आहेत.