बार्शी : बार्शी तालुक्यातील बार्शी- भूम रोडवर आगळगाव-काटेगाव दरम्यान च्या मार्गावर तालुका पोलिसांची रात्रीची गस्त सुरू असताना तीन चोरटे अन् तीन पोलिस, दोन होमगार्ड यांच्यात झटापट झाली. यामध्ये दोन पोलिस जखमी झाले आहेत. एका चोरट्यास शस्त्रासह पोलिसांनी पकडले असून, त्याच्याकडून एक लाखाचा ऐवज जप्त केला आहे. दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. जखमी पोलिसांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सडकेल सूरचंद भोसले ऊर्फ शिवा गंगाराम भोसले (वय 30, रा. परंडा रोड, कुर्डुवाडी, ता. माढा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह पळून गेलेले दोघे अशा तिघांवर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार योगेश मंडलिक यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना गुरुवारी पहाटे चारच्या दरम्यान घडली.
तालुका पोलिस ठाण्याचे पथक एमएच 12 पीक्यू 3510 या शासकीय वाहनातून रात्रीची गस्त घालत असताना आगळगाव-काटेगाव हद्दीमध्ये चुंबकडून वेगात येणारी दुचाकी दिसली. पोलिसांनी हात करून थांबवण्याचा प्रयत्न केला पण दुचाकीस्वार थांबले नाहीत. पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.


त्या वेळी तिघेजण दुचाकी टाकून देऊन शेतातून पळून जात होते. चोरट्यांमधील एकजण पळताना ठेच लागून पडला अन् पोलिसांनी त्याला पकडले. त्या वेळी त्याने पोलिस मंडलिक यांच्या हातावर सुऱ्याने वार केला व उजव्या हाताचा चावा घेतला. पळून जाणाऱ्या दोघांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस बळिराम बेदरे यांनी इतर दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोळ्याच्या खाली व छातीवर दगड लागला तर दंडाचा चावा घेऊन चोर पळून गेले.
पोलिस वाहन चालक धुमाळ, टोणपे व होमगार्ड शाहीर, काशीद यांनी शस्त्रासह भोसले यास पकडून ठेवले. त्याची तपासणी केली असता चार इरकल साड्या, एक धोतर, एक मंगळसूत्र, एक शाल, दोन सुरे, एक कात्री, एक पोपटपाना, दोन फेटे, एक चेन, ब्लेड, बॅटरी, कानातील रिंगा, धातूची चेन यासह एमएच 45 एजे 1638 ही दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी घटना घडताच बार्शी तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि जादा कुमक मागवली. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.