बार्शी: बार्शी शहरातील सर्व गणेश भक्तांना बार्शी नगरपरिषद व बार्शी शहर पोलीस स्टेशन यांच्यावतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाने यावर्षीचा गणेश उत्सव व विसर्जन साध्या पद्धतीने करण्यासाठी आवाहन केलेले आहे. चालू वर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पूर्णपणे बंदी करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व गणेश भक्तांनी गणपती मुर्तींचे विसर्जन आपल्या घरामध्येच करायचे आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी केले आहे.


ज्यांच्याकडे पीओपीच्या मूर्ती असतील आणि त्या घरांमध्ये विसर्जित करणे शक्य न झाल्यास अशा मुर्ती नगरपरिषदेकडून आपण राहत असलेल्या भागांमध्ये प्रभाग निहाय संकलित करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी खालील प्रमाणे दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सदरचे विसर्जनासाठीचे मूर्तीचे संकलन होणार आहे.
- गणेश मूर्तींचे विसर्जन माघ महिन्यातील गणपती विसर्जना बरोबर किंवा पुढील वर्षीच्या गणेश विसर्जना बरोबर करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
- शाडू मातीच्या गणेश मूर्तींचे विसर्जन प्रत्येकाने आपल्या घरातच करावे.
- मूर्ती संकलनाचे ठिकाणी घेऊन येणाऱ्या गणेशमूर्तींची विसर्जनासाठीची आरती घरीच करावी.
3.मूर्ती दान करण्यासाठी येणाऱ्या गणेश भक्तांनी समाजिक/ शारीरिक अंतराचे पालन करावे.
- सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक राहील.
- एका मूर्तीचे विसर्जनासाठी एकाच भाविकाने संकलनाच्या ठिकाणी यावे.
- विसर्जनासाठी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यात येऊ नये.
- गणपती उत्सवाचे निर्माल्य नगर परिषदेमार्फत पुरवण्यात येणार्या निर्माल्य गाडी मध्येच टाकावे, ते इतरत्र फेकू नये.
- विसर्जनासाठीच्या गणेश मुर्ती संकलित करण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 ह्या वेळेतच राहील.
- शहरातील गृहरचना सोसायट्यांनी आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये कृत्रिम तलाव अथवा टाकी तयार करून यामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन एकाचवेळी गर्दी न करता विभाजून टप्प्याटप्प्याने करावे. 10.गृहरचना सोसायट्यांनी मूर्तीदान करणार असल्यास सर्व मूर्ती प्रतिकात्मक विसर्जन करून सोसायटीमधील एका ठिकाणी संकलित कराव्यात.
11 प्रभागनिहाय मूर्ती संकलित करण्याची ठिकाणे यांची विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी केली जाईल
आपले नम्र
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बार्शी शहर
पोलीस स्टेशनमुख्याधिकारी बार्शी नगरपरिषद, बार्शी