खांडवी शिवारात जुगार खेळताना पोलिसांचा छापा, सात जणांवर गुन्हा
बार्शी : खांडवी शिवारात शेतात तिरट नावाचा जुगार खेळत असताना बार्शी तालुका पोलिसांनी छापा टाकून १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त करत सात जणाविरोधात गुन्हा दाखल केला.

मुकेश अंबऋषी भोरे (वय ३१, रा.कसबा पेठ बार्शी), अमोल सुंदरराव देशमुख (वय ४२, रा.४२२ बार्शी ) अतुल दशरथ बागल, (वय ३५, रा.एकविराई रोड बार्शी), महेश चंद्रकांत पवार ( वय २८, रा.एकविराई गल्ली, बार्शी ) मनोज माळी (रा.४२२ बार्शी), खाजाभाई शेख (रा.४२२ बार्शी ), प्रशांत शिवाजी जाधव (रा.बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दि २९ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

खांडवी शिवारात गोडसेवाडी ते कव्हे रस्त्याजवळ जाणारे कदम यांचे शेताचे बाजुला काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार तालुका पोलीस सदर ठिकाणी गेले असता तेथे सात जण तीन पत्ती नावाचा जुगार पैशावर खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच ते पळू लागले. त्यातील भोरे, देशमुख, बागल, पवार अशा चौघांना पोलिसांनी जागेवरच पकडले. त्यांना पळून गेलेल्या व्यक्तींची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे मनोज माळी, खाजाभाई शेख, प्रशांत जाधव असल्याचे सांगितले.
पोलिसांनी जुगाराचा डाव व रोख रक्कम २३,१०० रुपये तसेच मोटार सायकल असे जुगाराचे साहीत्य मिळून एकुण १,८८,१०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
संबंधितांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला.