तरुणाईच्या स्वप्नपूर्तीसाठी पोलीस दाम्पत्याचा पुढाकार ; ग्रामस्थांच्या मदतीने उभारली अभ्यासिका आणि मैदान

0
943

तरुणाईच्या स्वप्नपूर्तीसाठी पोलीस दाम्पत्याचा पुढाकार

ग्रामस्थांच्या मदतीने उभारली अभ्यासिका आणि मैदान

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर : हल्लीच्या तरुणाईला खाकी वर्दीचे आकर्षण आहे. खाकी वर्दीच्या स्वप्नपूर्तीसाठी लाखो तरुण प्रयत्न करत असतात. पोलीस भरतीच्या तयारीसाठी हजारो रुपये खर्च करत तरुण खासगी शिकवणीचा आधार घेतात. मात्र दुसरीकडे असेही काही तरुण आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते स्वयं अध्ययनावर भर देतात. अशा तरुणाईचा स्पर्धा परीक्षेतील सहभाग वाढावा अाणि त्यांचे खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी गावात एका पोलीस दाम्पत्याने अभ्यासिका आणि शारीरिक चाचणीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले आहेत.

लक्ष्मण कोळेकर- विद्या माळगे असं या पोलीस दाम्पत्याचे नाव असून ते दोघेही पोलीस नाईक सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलात कार्यरत अाहेत. तालुका मंगळवेढा येथील रड्डे नावाचे पाच हजार लोकसंख्येचे गाव. इथला दुष्काळ जणू पाचवीला पुजलेला. याच गावातील लक्ष्मण कोळेकर. पोलीस दलात भरती होण्यापूर्वी लक्ष्मण यांची परिस्थिती बेताची होती. अर्धवेळ नोकरी करत त्यांनी पोलिस भरतीची तयारी सुरू ठेवली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश अाले अाणि २००७ साली ते पोलीस दलात भरती झाले.

मध्यंतरी कोरोनाच्या परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर झाले. इस्लामपूर, सांगली, मंगळवेढा या ठिकाणी राहून गावातील तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचे. लॉकडाऊनमुळे सर्व तरुण गावाकडे परत अाले. गावात अभ्यासिका आणि शारीरिक तंदुरुस्त ठेवण्यासाठी साहित्य उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येऊ लागल्या. तरुणाईची हीच अडचण लक्ष्मण यांनी हेरली. त्यांची पत्नी विद्या माळगे आणि  ग्रामस्थांच्या मदतीने अभ्यासिका आणि शारिरीक चाचणीचे साहित्य उपलब्ध करून दिले.

गावात असलेल्या समाजमंदिरामध्ये सुसज्ज अशी अभ्यासिका उभारली. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संबंधित पुस्तके अाणि संदर्भग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले अाहे. अाज  32 विद्यार्थी या अभ्यासिकेचा लाभ घेऊ शकतात. त्यांनंतर  गावाजवळच असलेल्या शासकीय जागेवरील काटेरी झुडपे जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकून परिसर स्वच्छ केला. येथेच लांबउडी, गोळाफेक पुलप्स यांचे साहित्य बसवण्यात आले. गावानजीक आज सुसज्ज मैदान उभारले असून अनेक बेरोजगार तरुण येथे शारीरिक चाचणीची तयारी करत आहेत.

सध्या लक्ष्मण कोळेकर हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील श्वान पथकामध्ये पोलीस नाईक तर त्यांच्या पत्नी पोलीस नाईक विद्या माळगे या सुरक्षा शाखेत कार्यरत आहेत. बेरोजगार तरुणांसाठी सुरु केलेल्या त्यांच्या या उपक्रमास गावकऱ्यांनी मोलाची साथ दिली आहे. त्यांना गावातील विकास सांगोलकर, सिद्धनाथ कांबळे,  अनिल थोरबोले राजू गवळी, रामा सपताळे, दिगंबर नवत्रे , सुनील थोरबोले, अजय सपताळे यांच्यासह अनेक तरुणांनी मदत केली अाहे.

चौकट
गावातील यशस्वी शिलेदार

वास्तविक पाहता मंगळवेढा तालुक्यातील रड्डे हे गाव दुष्काळग्रस्त आहे. गावात अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. येथील बहुतांश मुले ऊसतोडणीच्या कामाला जातात. गावात सोयी सुविधांचा अभाव असतानाही काही तरुणांनी यावर मात करत यशाचे शिखर गाठले आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी झालेल्या तृप्ती दोडमिसे- नवत्रे, डीवायएसपी सचिन थोरबोले, ए.पी.आय.बालाजी कांबळे, पी.एस.आय. सूर्यकांत सप्ताळे यांच्या यशानंतर अनेक तरुणाईचा ओढा स्पर्धा परीक्षेकडे वाढला आहे.

कोट
उज्ज्वल भविष्यासाठी घेतला पुढाकार
लक्ष्मण कोळेकर, पोलीस नाईक

मी पोलिस भरतीची तयारी करत असताना मला अनेक संकटाचा सामना करावा लागला होता. भविष्यात पोलीस भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलांना अशा अडचणी येऊ नये, त्यांचा स्पर्धा परीक्षेत सहभाग वाढावा, यासाठी गावकऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला आहे.

चौकट
गृहमंत्र्यांनी दिली शाबासकीची थाप

बेरोजगार तरुणाईचे भवितव्य घडवण्यासाठी कोळेकर पोलीस दाम्पत्याने पुढाकार घेत सुरू केलेल्या या उपक्रमाचे सर्वदूर कौतुक होत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत त्यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here