आंब्याची रोपे तयार करून लोकांना वाटतात मोफत
पापरी गावच्या शहा कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक उपक्रम
सोलापूर : पापरी येथील वृक्षप्रेमी सम्मेद शहा यांनी स्वत:च्या घराजवळ रोपवाटिका तयार करून लोकांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम सुरु केला अाहे. पर्यावरण संवर्धनास हातभार लावणारा शहा कुटुंबीयांचा हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून उपक्रम अविरतपणे सुरु आहे. आतापर्यंत त्यांनी अडीच हजारपेक्षा जास्त रोपे मोफत दिली आहेत.

पापरी येथे शहा परिवाराची अकरा एकरची शेती आहे. काही वर्षांपूर्वी सम्मेद यांचे वडील राजकुमार शहा यांनी आपल्या शेतात आंब्याचे झाड लावले. झाड मोठे झाल्यावर ते आंब्याच्या फळांनी लगडून गेले.
झाडाला लागलेली फळे साखरे सारखी गोड अाहेत. दरवर्षी झाडाला दोन अडीच हजार फळे हमखास येतात. या झाडाला लागलेली अांबे कुणालाही न विकता ते नातेवाईक अाणि मित्र परिवारास वाटून टाकतात.


अशी आंब्याची गोड झाडे सर्वत्र असावी तसेच झाडे लावून पर्यावरण वाचावे, असा विचार शहा यांच्या मनात आला. त्यांनंतर त्यांनी आपल्या घरासमोर छोटीशी रोपवाटिका बनविण्याचा निर्णय घेतला. या रोपवाटिकेतून तयार झालेली रोपे ते शाळा, सामाजिक संस्था यांना मोफत देतात. घरी आंबे खाल्ले किंवा त्याचा आमरस काढल्यावर त्याच्या कोय टाकून न देता दरवर्षी त्याची पाचशेच्या वर रोपे तयार करतात.
वर्षभर सदर रोपे नातेवाईक, मित्र, राजकारणी व्यक्ती यांचा कुणाचा वाढदिवस अथवा कार्यक्रम असल्यास सदर रोपे भेट देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करतात. पावसाळा सुरू झाला की, कागदी पिशव्यांमध्ये माती भरून कोयीचे रोपण केले जाते. ही रोपे बनवण्यासाठी शहा कुटुंबातील सर्व सदस्य मदत करत असतात. रोज नियमितपणे या रोपांना पाणी देणे आणि त्याची वाढ कशी होईल यासाठी निगा राखली जाते.
कोट-
पर्यावरण संवर्धनास मदत होईल
आम्ही अांब्याची रोपे तयार करुन वाटप करत असतो. यामुळे भविष्यात मोठे वृक्ष होवून पर्यावरण संवर्धनास हातभार लागेलच. शिवाय हजारो फळे त्यांस लागतील त्या पासूनही शेकडो झाडे बनतील. ज्यांना ज्यांना अगोदर रोपे दिली आहेत ते त्याची जोपासना करत आहेत. या उपक्रमातून आम्हाला मोठे समाधान मिळते.
-सम्मेद शहा, पापरी