बार्शी व खांडवी मंडळातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश
24 तासात पडला 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन,उडीद,मूग व कांद्याचे रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिके जवळपास वाया गेल्यात जमा आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील बार्शी व खांडवी या दोन मंडळामध्ये 24 तासात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस होऊन नुकसान झाल्याने या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार सुनील शेरखाने यांनी काढले आहेत.


तालुक्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सलग तीन चार दिवस साठ मिमी पेक्षा जास्त पाऊस पडला.या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणी साचले. तसेच यावर्षी पाऊस लेट पडल्यामुळे पेरण्याही लेट झाल्या त्यामुळे पिकांची वाढ ही उत्तम प्रतीची झाली नव्हती. त्यातच ढगाळ वातावरण व सततचा लागून असलेला पाऊस यामुळे ही पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. या स्थितीत आमदार राजेंद्र राऊत यांनी देखील तहसील कार्यालयात कृषी आणि महसूल विभागाची आढावा बैठक घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.
या अनुषंगाने तहसीलदार सुनील शेरखाने यांनी गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने शासनाच्या नुकसानीच्या महसूल व वन विभागाच्या अध्यादेशानुसार व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकाने बार्शी व खांडवी मंडळातील 24 गावांचे नुकसानीचे पंचनामे करण्याबाबतच्या करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रत्येक मंडळासाठी प्रमुख म्हणून मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी व पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर नियंत्रण अधिकारी म्हणून निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंडे हे काम पाहणार आहेत.
या पथकाने नुकसानीची तिघांच्या संयुक्त स्वाक्षरीची यादी तयार करून घ्यावी व अनुदान यादी सादर करताना बँक खाते, आयएफसी कोड तसेच यादीत दुबार नाव नसल्याचे खात्री केल्याचे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे.