कोरोना व्हायरसच्या संकटात संपूर्ण जगभरात निराशेचं वातावरण असतानाच, मनाला सुखावणाऱ्या काही घटनाही समोर आल्या आहेत. कर्नाटकमधून अशी एक कहाणी समोर आली आहे, जी प्रेमाला नवी व्याख्या देते.

कर्नाटकमध्ये एका व्यापाऱ्याने पत्नीच्या वियोगाने दुःखी न होता तिच्या प्रेमापोटी हुबेहुब दिसणारा सिलिकॉनचा पुतळा तयार करुन घेतला . तसेच त्या पुतळ्यासह आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला. यातून या व्यापाऱ्याने आपल्या पत्नीसोबत पाहिलेलं स्वप्नही पूर्ण केलं.

सोफ्यावर माधवी यांना बसलेलं पाहून गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात सामील झालेल्या पाहुण्यांना धक्का बसला. परंतु माधवी यांचा पुतळा असल्याचं समजल्यानंतर तेही पुतळ्याकडे पाहतच राहिले

कोप्पल इथे राहणारे व्यापारी श्रीनिवास गुप्ता यांची पत्नी माधवी यांचं 2017 मध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता. माधवी यांनी नव्या घराचं स्वप्न पाहिलं होतं, परंतु ते पूर्ण होण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचं घर आता पूर्ण झालं, पण ते पाहायला, त्यात राहायला माधवीच या जगात नाहीत.

मात्र आपल्या नव्या घरात पत्नी असावी यासाठी श्रीनिवास गुप्ता यांनी माधवी यांचा सिलिकॉनचा पुतळा बनवला आणि त्यासोबतच गृहप्रवेश केला.

बंगळुरुमधील कलाकार श्रीधर मूर्ती यांनी एक वर्षांच्या परिश्रमाने त्यांच्या पत्नीचा पुतळा बनवला आहे. यासाठी सिलिकॉनचा वापर करण्यात आला आहे, असं श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितलं.

आपली पत्नी सोबत नसताना तिच्या आठवणीत सिलिकॉनचा पुतळा तयार करणारे श्रीनिवास गुप्ता गृहप्रवेश करताना मात्र भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. या नव्या घरात माझ्यासह माझी पत्नी देखील आली आहे. याचा मला खूप आनंद आहे. हे घर तिचं स्वप्न होतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सुरुवातीला माझ्या मनात मेणाच्या पुतळ्याचा विचार आला होता. परंतु हा गरम परिसर आहे, त्यामुळे सिलिकॉनचा पुतळाच योग्य ठरेल, असं श्रीधर मूर्ती यांनी सांगितल्याचं श्रीनिवास गुप्ता म्हणाले

नव्या घरातील प्रवेशादरम्यान श्रीनिवास गुप्ता भावुक झाले. नव्या घरात पत्नीचा प्रवेश झाला आहे, मला अतिशय आनंद झाला आहे. हे घर तिचं स्वप्न होतं, असं गुप्ता यांनी सांगितलं.
श्रीनिवास यांच्या पत्नी माधवी यांचा तिरुपती यात्रेदरम्यान अपघात झाला होता, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या दोन्ही मुलींनाही दुखापत झाली होती, सुदैवाने त्यांची प्रकृती सुधारली.
