राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष काका साठेंनी झेडपीच्या आवारात दिली एकाच्या ‘कानाखाली’ | वाचा सविस्तर-
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष बळीराम काका साठे हे अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले हागणदारीमुक्त गाव म्हणून वडाळ्याचा नामोल्लेख होतो. काका साठे हे स्वतः पहाटे चार वाजता उठून गावातील हागनदारी मुक्ती साठी फिरत असत, घडयावर शौचास बसणार्याना त्यांनी चांगलाच चोप सुद्धा दिल्याची माहिती ऐकण्यास मिळते. म्हणूनच आजपर्यंत वडाळा मध्ये त्यांचा शब्द हा शिरसंवाद म्हणून मानला जातो.

गावातील भांडण, वाद हे पोलीस स्टेशन पर्यंत जाण्यापेक्षा काका साठे यांच्या दरबारी सुटतात. वडाळा गावांमध्ये त्यांनी दारूबंदी ठेवली आहे. ते स्वतः निर्व्यसनी असल्याने कोणी जर दारू पिऊन घरात भांडण करत असेल तर त्याला सगळ्या गावासमोर चोप देतात, असे वडाळाकर सांगतात, त्यामुळे काकांसमोर दारू पिऊन येण्याचे कुणाचंही धाडस होत नाही.

बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये दुपारी चारच्या सुमारास काका साठे यांनी कुणाच्या तरी कानाखाली जोरात वाजवल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली. नेमके त्यावेळेस कोणीही पत्रकार नव्हते, काय घडले हे सुद्धा समजले नाही.
याबाबत अधिक माहिती घेतली असता जेव्हा काका साठे हे जिल्हा परिषदेचे मधून बाहेर पडत होते, त्यांच्यासोबत कायमच कार्यकर्त्यांचा गराडा असतो तेव्हा एक वडाळा गावातीलच इसम दारूच्या नशेत काका साठे यांच्या समोर आला, काकांनी त्याला जायला सांगितले मात्र तो जायला तयारच नव्हता, काकांसमोर बडबड करू लागला शेवटी काका आपल्या मूळ स्वभावावर आले. त्या इसमाला दोन कानाखाली लगावली आणि तिथून हाकलून लावले अशी माहिती मिळाली. दरम्यान ही चर्चा सायंकाळी सहा पर्यंत जिल्हा परिषदेमध्ये ऐकण्यास मिळत होती.