वैराग : चोरीच्या सोन्यावरुन चाललेली भांडणे सोडवून याबद्दल पोलिसांना सांगेन म्हणाल्यामुळे वैराग येथे एका युवकाचा खून करण्यात आला.
दि. २ मार्च २०२२ रोजी दुपारी साडेचारचे सुमारास, सुरेश महादेव पवार (वय ३९), रा. संजयनगर वैराग यांस राजाभाऊ पांढरमिसे यांनी फोन करुन सांगितले की, तुझा भाऊ सचिन उर्फ पप्पू पवार याला कांबळे याचे दुकानात मारहाण चालू आहे. त्यामुळे सुरेश आईसह तेथे गेला असता, दुकानासमोर त्याचा भाऊ पप्पू जखमी अवस्थेत पडलेला दिसला.
त्यावेळी पप्पूने सुरेश व आईला सांगतिले की, दुपारी हरी केकडे व त्याचे टोळी मधील साथीदार जुबेर शेख, मिथुन साळवे, व अखील यांची चोरीच्या सोन्यावरून चाललेले भांडण मी सोडवले. त्यावेळी मी त्यांना बोललो होतो की, तुमच्या टोळीचे नांव पोलीसांना सांगून भांडाफोड करेन. त्याचा राग मनात धरुन मला हरी केकडे याचे सांगण्यावरुन जुबेर शेख, मिथुन साळवे, व अखील यांनी मला कांबळे यांचे दुकानात लाकडी ठोकळ्याने व धारदार हत्याराने मारहाण केली असून, माझ्या मोटरसायकलवर बसून ते पळून गेले आहेत.
तेव्हा सुरेशने जखमी पप्पूला तातडीने वैराग येथील सरकारी दवाखाना आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तेथून बार्शीला जगदाळे मामा हॉस्पिटल आणि तेथून सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता दि. ३ मार्च २०२२ रोजी अश्विनी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी तो मयत झाल्याचे सांगितले.
सुरेश महादेव पवार याच्या तक्रारीनुसार वैराग पोलिस ठाण्यात हरी केकडे, जुबेर शेख, मिथुन साळवे आणि अखील यांच्याविरुध्द भा.दं.वि. ३०२, ३४, ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
