खासदार ओमराजें निंबाळकरांनी बांधली पायाला भिंगरी; वाचा सविस्तर का आणि कशासाठी ते
बार्शी – सोलापूर जिल्ह्यांसह बार्शी तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर हे मतदारसंघात दौरे करत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यानंतर ओमराजेंनी बार्शीवर विशेष प्रेम दाखवलंय. बार्शी तालुक्याच्या ग्रामीण भागातील ज्यागावात कोरोना रुग्ण आढळुन आला आहे त्यागावाला भेट देतात. गावकऱ्यांना धीर देण्यासोबत उपाययोजनांचा आढावा घेत आहेत. अशा प्रकारे गाव खेड्याना भेटी देऊन लोकांच्या अडीअडचणी जाणून घेणारे बार्शी ला लाभलेले ते पहिले खासदार आहेत.

कोरोनाने विळखा घातलेल्या बार्शी तालुक्याचा आढावा घेण्यासाठी रविवारी खासदार निंबाळकर यांनी तालुक्यातील चारे, चुंब, आगळगाव, भोयरे, गाताचीवाडी, धामणगाव, आरणगाव, धोत्रे, खामगाव, पानगाव,मानेगाव,सासुरे,राळेरास, शेळगाव, सर्जापुर,इर्ले, सुर्डी, गुळपोळी यासह अनेक गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने गावास भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी गावातील नागरिकांशी चर्चा केली.

कंटेनमेंट भागातील नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रशासकीय यंत्रणेस ओमराजेंकडून देण्यात आल्या. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण काकडे, नायब तहसीलदार संजीवन मुंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.जे.बुवा, संबंधित पोलीस स्टेशन चे अधिकारी , ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी, पोलिस पाटील आशा कर्मचारी, ग्रा.प.कर्मचारी आदी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.