मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारचे ५ महत्वाचे निर्णय – वाचा सविस्तर-
नवी दिल्ली, ८ जुलै : लॉकडाऊनच्या काळात सामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतांपर्यंत साऱ्यांनाच सुटकेचा निश्वास सोडता यावा याकरता केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आता केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पुढील ३ महिने २४ टक्के कर्माचारी भविष्य निर्वाह निधी सरकार भरणार आहे. शिवाय, उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजीचा तिसरा सिलेंडर सप्टेंबरपर्यंत मिळणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.

मागच्या वेळेस देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजनांना मुदतवाढ दिल्याचे सांगितले होते. या मुदतवाढीची आज अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.
मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे उज्ज्वला योजनेंतर्गत गरिबांना मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचा विस्तार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने मोफत एलपीजी सिलिंडर योजनेचा उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत विस्तार केला आहे.

म्हणजेच त्यांना आणखी विनामूल्य एलपीजी सिलिंडर मिळणे सुरूच राहणार आहे. तेल कंपन्या ईएमआयसंदर्भात योजनेचा कार्यकाळ पुढील एक वर्षासाठी वाढवू शकतात, जी या वर्षी जुलै 2020मध्ये संपत आहे. याचाच अर्थ पुढील एका वर्षासाठी एलपीजी सिलिंडर (एलपीजी सिलिंडर) खरेदी करणा-या उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना तेल कंपन्यांना कोणतीही ईएमआय रक्कम देण्याची गरज भासणार नाही.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात ७४.३ कोटी इतके लाभार्थी होते. तर त्यात वाढ होऊन मेमध्ये ते ७४.७५ कोटी आणि जूनमध्ये ६४.७२ कोटी इतक्या लोकांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे जावडेकर म्हणाले.
या बरोबरच ओरिएंटल इंश्योरन्स कंपनी लिमिटेड, यूनायटेड इंडिया इंश्योरन्स कंपनी लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील जनरल इंश्योरन्स कंपन्यांमध्ये १२४५० कोटी रुपयांच्या भांडवल गुंतवण्याला मंजुरी दिली आहे, अशी माहितीही जावडेकर यांनी दिली आहे.