बार्शी : इयत्ता १ ली पासून बार्शीतील मामाकडे शिक्षणासाठी राहिलेली अल्पवयीन मुलगी १० वी चा शेवटचा पेपर देऊन बेपत्ता झाल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे.
याबाबतची माहिती अशी की, ताडसौंदणे येथील मुलगी इयत्ता १ ली पासूनच आपल्या आजोळी, मामाकडे शिक्षणासाठी राहिली होती. बार्शीतील एका प्रशालेत ती शिक्षण घेत होती.
दि. ४ एप्रिल २०२२ रोजी त्या मुलीने १० वीच्या परिक्षेचा शेवटचा पेपर दिला. आणि दुसऱ्या दिवशी ती गांवी आपल्या आई वडिलांकडे सुट्टी साठी जाणार होती. त्यासाठी दुपारी साडेचारच्या सुमारास तिची मामी तिला कपडे घेण्यासाठी आपल्या दोन मुलीसह पांडे चौकातील एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेली.
ही मुलगी कपडे बघत होती, तोपर्यंत लहान मुलगी पुढे गेली म्हणून मामी त्या मुलीला आणायला गेली. तितक्यात ही कपडे बघत असलेली मुलगी नजर चुकवून बाहेर गेली. लहान मुलीला परत घेऊन आल्यावर मामीला तिची भाची दुकानात दिसली नाही, तसेच आजूबाजूला हुडकूनही ती दृष्टीस पडली नाही, म्हणून तिने पतीला व दीराला फोन करुन बोलावून घेतले. त्या सर्वांनी मिळून तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही.
म्हणून तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तिने पळवून नेल्याची त्यांची खात्री पटली. त्यामुळे तशी तक्रार बार्शी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तिविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
