माऊली संजीवन समाधी विशेष: ज्ञानीयांचा राजा गुरु महाराव । म्हणति ज्ञानदेव तुम्हा ऐसे ।।

0
558

आज श्रावण कृष्ण अष्टमी. अर्थात दोन महान विभूतींचा जन्मदिवस. संपूर्ण विश्वाला उपनिषदांतील तत्त्वज्ञानाचे सार गीतारूपाने सांगणारे जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण आणि त्याच गीतेला मराठीमध्ये भाषांतरीत करून अमृताच्या गोडीलाही पैजेने जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरीचे रचनाकार संत ज्ञानेश्वर महाराज ह्या दोन विभूंतीचा आज जन्मदिवस.

दोघांनीही जगाच्या कल्याणासाठी गीता सांगितली हा योगयोग म्हणावा तर दोघांचाही जन्म कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री झाला याला काय म्हणावे ? हा योगायोग नाही तर स्वतः भगवान श्रीकृष्णच ज्ञानेश्वरांच्या रूपाने गीतेचे तत्त्वज्ञान पुन्हा एकदा सर्वांना सांगण्यासाठी जन्माला आले. “महाविष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ।।” असे सार्थ वर्णन संत जनाबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींचे केलेले आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

संत ज्ञानेश्वर हे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीदेवी यांच्या चार अपत्यांपैकी दुसरे अपत्य. निवृत्तीनाथ वडीलधारे, सोपानदेव आणि मुक्ता हे ज्ञानेश्वरांपेक्षा लहान. त्यांच्या वडीलांनी विरक्तीमुळे विवाहानंतर संन्यास घेतला; मात्र ईश्वराच्या मनात वेगळेच काहीतरी होते म्हणून गुरुआज्ञेमुळे पुन्हा गृहस्थात प्रवेश केला. यामुळे समाजाने त्यांना व त्यांच्या मुलांना वाळीत टाकले. मुलांवर बट्टा लागू नये म्हणून विठ्ठलपंत – रूक्मिणी यांनी इंद्रायणीच्या डोहात आपले जीवन संपवले.

संत निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर गहिनीनाथांनी अनुगृहित केले होते आणि कलिययुगातील भविष्य जाणून सामान्य जीवांच्या कल्याणासाठी वारकरी संप्रदाय वाढविण्याची आज्ञाही केली होती. त्यानुसार संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताई यांना अनुगृहित केले.

एकदा छोट्या मुक्ताईला मांडे खाण्याची इच्छा झाली तेव्हा ज्ञानेश्वरांनी योगाग्नी प्रदीप्त करून पाठीवर मांडे भाजले. हेच ज्ञानदेव भिक्षा मागण्यासाठी आळंदीत गेले असताना त्यांना अपमानास्पद बोलणी ऐकावी लागली तेव्हा त्यांनी उद्विग्न होऊन ताटीचे (झोपडीचे) दार लावून घेतले. तेव्हा मुक्ताईने त्यांची समजूत काढण्यासाठी ताटीच्या अभंगांची रचना केली.

ही चारही भावंडे पैठणला धर्मपीठासमोर शुद्धीपत्र मागण्यासाठी गेली असताना ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बोलवण्याची किमया करुन दाखवली. यानंतर सर्वांनी ह्या चारही भावंडांचा अध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार मान्य करून त्यांचे चरण धरले.

गीतेतील तत्त्वज्ञान लोकांना संस्कृतच्या अज्ञानामुळे समजत नव्हते. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथे गीतेचे मराठीत भाषांतर केले जे ‘भावार्थदीपीका’ म्हणून ओळखले जाते. संत नामदेवांनी ह्या भावार्थदीपीकेचे नामकरण ‘ज्ञानेश्वरी’ असे केले. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टिका असूनही गीतेपेक्षा ती सरस आणि रसाळ आहे, हे ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याच्या अनुभवाला आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरी ही प्राकृत मराठी भाषेत असून प्राकृतातील ५६ विविध भाषांची त्यात अत्यंत अनोख्या पद्धतीने गुंफण ज्ञानदेवांनी केली आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे सर्व प्रकारचे तत्त्वज्ञान अंतर्भूत आहे.

ज्ञानेश्वरीव्यतिरिक्त ज्ञानदेवांनी त्यांचे स्वतःचे अध्यात्मिक अनुभव सांगणारा ग्रंथ ‘अनुभवामृत’ रचला. हा ग्रंथ अत्युच्च तत्त्वज्ञानाने भरलेला आहे. ज्ञानदेवांनी रचलेला हरिपाठ हा सर्वसामान्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने भक्ती कशी करावी हे सांगणारा आहे.

संत ज्ञानेश्वरांनी संत चांगदेवांच्या कोऱ्या पत्राला उत्तर म्हणून ६५ ओव्यांचे एक काव्य रचले जे ‘चांगदेवपासष्टी’ म्हणून ओळखले जाते.

संत ज्ञानदेव हे मराठी विश्वातील एक अत्यंत थोर संत, तत्त्वज्ञ आणि कवी आहेत. त्यांच्या प्रतिभेचे वर्णन शब्दांनी करता येणे अशक्य आहे. “माझा मऱ्हाठाचि बोलू कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।।” अशी प्रतिज्ञा ज्ञानेश्वरांनी करून ती खरी देखील करून दाखवली. तत्त्वज्ञान हे केवळ संस्कृतातच असते असे नाही तर ते कोणत्याही भाषेत असू शकते, असा विश्वास ज्ञानेश्वरांना वाटत होता आणि त्यानुसार त्यांनी तत्त्वज्ञान मांडले देखील. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारख्या अद्भुत ग्रंथाची रचना केली आणि २१व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत. ते संत नामदेव आणि गोरा कुंभार यांचे समकालीन होते. संत ज्ञानेश्वर हे मूळचे नाथसंप्रदायी असले तरी त्यांची सगळी साहित्यरचना आणि त्यांचे कार्य हे भागवत संप्रदायाचेच आहे. योगक्षेत्रातील त्यांचा अधिकार फार मोठा आहे. संत तुकोबांनी देखील त्यांचे वर्णन करताना – “तुका म्हणे नेणे युक्तीचीये खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ।।” असे म्हटले आहे. ज्ञानेश्वरांचे योगसामर्थ्य अत्यंत अद्भुत होते.

ज्ञानेश्वरांनी अत्यंत आर्त मनाने ईश्वराला आळवले. सर्व भूतमात्रांच्या ठायी एकच परमात्मा व्याप्त असल्याने कोणचाही मत्सर आपल्याकडून होऊ नये असे ते सांगतात. ” हे विश्वचि माझे घर ।” हा उद्दात्ता संदेश ज्ञानोबांनी आपल्याला दिला. त्यांनी सर्व विश्वासाठी पसायदान मागितले. “भूता परस्परे जडो । मैत्र जीवांचे ।।” ही पसायदानातील ओवी आपण सर्व लहानपणापासून म्हणत आलो असेलच. ज्ञानेश्वर हे एक आदर्श संत, तत्त्वज्ञ व कवी असण्याबरोबरच एक आदर्श शिष्य देखील आहेत. ज्ञानेश्वरीत जागोजागी त्यांनी केलेल्या गुरूस्तुतीवरून हे आपल्याला प्रत्यसास येते. त्यांची काव्यरचना अत्यंत प्रतिभासंपन्न आहे. आजपर्यंत अशी काव्यारचना कोणीही निर्माण करू शकलेले नाही.

कार्तिक वद्य त्रयोदशीला वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ज्ञानदेवांच्या समाधी सोहळ्याचे अत्यंत भावूक वर्णन संत नामदेवांनी त्यांच्या अभंगात केले आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असलेल्या अशा ज्ञानदेवांचा आज जन्मदिन. ह्या जन्मदिनी माऊलींना कोटी कोटी दंडवत !!!!!

ज्ञानीयांचा राजा गुरु महाराव । म्हणति ज्ञानदेव तुम्हा ऐसे ।।

©️गजानन जगदाळे

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here