‘मार्कंडेय एक्सप्रेस’ रेल्वे गाडीत भरणार शाळा
आनंददायी शिक्षण देण्याचा कुचन प्रशालेचा प्रयत्न
अनोख्या रेल्वे शाळेत जाण्यास विद्यार्थी उत्सुक
सोलापूर : एखादी शाळा रेल्वेत भरणार अाहे म्हटलं तर विश्वास बसणार नाही. पण हे खरे अाहे. सोलापूर शहरातील कुचन प्रशालामधील शाळेतील वर्ग खोल्यांचे रुपडे पालटले आहे. येथील वर्गखोल्यांना रेल्वेचे रूप देण्यात आले आहे. चक्क रेल्वेचे प्रतिकात्मक रुप वर्गखोल्यांवर रंगवून जणू शाळा रेल्वेत असल्याचाच भास होतोय. या शाळेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून शाळेविषयी कुतुहलता वाढली आहे. नेमकी कशी आहे शाळा पाहुयात याचा स्पेशल रिपोर्ट.

शहराच्या पूर्व भागात असलेली कुचन प्रशाला. या शाळेत आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी शाळेला रेल्वेचे रूप द्यायचे अशी अभिनव संकल्पना संस्थेचे सचिव दशरथ गोप यांना सुचली. शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रंगरंगोटी करण्यास सुरुवात केली. शाळेतील कलाशिक्षक नितीन मिरजकर यांनी आपल्या कल्पकतेतून रंगसंगती केली. या शाळेला प्रतिकात्मकत रेल्वेचे रुप देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत नव्हे, तर रेल्वेत बसल्याचा भास होणार अाहे. बाहेरून तर ही शाळा हुबेहूब रेल्वे भासते.
खिडक्या उघडल्या तरी रेल्वेसारख्या खिडक्या दिसतील असे रंगकाम आहे. त्यामुळे या वर्गाचे “मार्कंडेय एक्स्प्रेस’ असे नामकरण केले आहे. लोकवर्गणीतून शाळेला हे एक्स्प्रेसचे रुपडे लाभले आहे. वर्ग खोल्याच्या आतील बाजूस अभ्यासक्रमाशी संबंधित बोलक्या भिंती तयार करण्यात आले आहेत. आज प्रत्येकाला हेवा वाटावा व विद्यार्थ्यांना आकर्षण वाटेल अशी ही शाळा दिसत आहे. या अनोख्या रेल्वे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी देखील उत्सुक आहेत.

पूर्व विभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील सहभाग वाढावा हा या उपक्रम राबवणे पाठीमागचा हेतू आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी ‘सुपर सेमी एक्सप्रेस’ असे क्लास तयार करण्यात आले आहे. यासाठी पाचवी आणि आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेला बसवण्यात येणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापक शरद पोतदार यांनी ‘दैनिक लोकवार्ता’ शी बोलताना दिली.
संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डुम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिवा संगीता इंदापूरे, खजिनदार नागनाथ गंजी, शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्याल, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. यासाठी प्राचार्य शरद पोतदार, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक जाहेदा जमादार, दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे यांचे सहकार्य लाभले.


चौकट
रेल्वेत बसल्याचा भास
या शाळेतील शिक्षक, पालकांच्या सहकार्यातून आम्ही नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण होईल. असाच प्रयोग शाळेला रंगरंगोटी करताना घेतला. हुबेहूब दिसणार्या रेल्वेगाडीत हे विद्यार्थी चक्क रेल्वेत प्रवेश करतात, असा भास होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास सुसाट सुरू झाला आहे आणि त्याचेच रुपांतर आज ‘मार्कंडेय एक्सप्रेस’ मध्ये झाल्याचे पोतदार यांनी सांगितले.

चौकट
आनंददायी शिक्षण देण्याची संकल्पना
एकीकडे मराठी शाळांचा टक्का घसरतोय, असं म्हटलं जाते मात्र राज्यातील अनेक शिक्षक नवनवीन प्रयोग राबवून शिक्षणाचा दर्जा वाढवताय हे मात्र नक्की. ही आनंददायी संकल्पना सर्वांनाच भावली आहे. हे शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिले आहे.