अल्पवयीन मुलाचा निघृणपणे खुन करणा-या नराधमास आजन्म सश्रम कारावास
बार्शी जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
बार्शी, प्रतिनिधी
उजनी धरणाजवळ भिमा नगर येथे मासे पकडण्यासाठी जायचे आहे म्हणून फुस लावून त्याचे मोटरसायकल वर बसवून २३ मार्च २०१७ रोजी शिराळ ता माढा या गावचे हददीतील उसाचे शेतात नेऊन इंद्रकुमार गायकवाड अल्पवयीन मुलाचा निर्घुणपणे खुन केल्याप्रकरणी आरोपी विश्वास जनार्धन साळुखे (वय ५० वर्षे ) या नराधमास बार्शी जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत माहिती की, यातील आरोपी विश्वास जनार्धन साळुखे हा दि.२३ मार्च २०१७ रोजी मौजे भाटनिमगांव ता.इंदापूर येथे पिरससाहेब याच्या जत्रेसाठी आला होता. आरोपीने मयत इंद्रकुमार गायकवाड, वय वर्षे १२ व आर्यन गायकवाड या दोघांना उजनी धरणाजवळ भिमानगर येथे मासे पकडण्यासाठी जायचे आहे म्हणून फुस लावून त्याचे मोटरसायकल वर बसवून घेवून गेला त्यानंतर यातील आरोपीने आर्यन यास उजनी पाटीच्या पुढे संत गुलाबबाबा रसवंती गृहाजवळ सोडून मयत इंद्रकुमार यास घेवून गेला. यातील आरोपीने इंद्रकुमार यास शिराळ ता माढा या गावचे हददीतील उसाचे शेतात निघृणपणे खून करुन निघून गेला. आरोपी हा मयताचा खून करुन करमाळा पोलीस स्टेशन येथे हजर झाला व तेथून पूढे त्यास टेंभुर्णी पोलिसांच्या ताब्यात देवून आरोपी विरुध्द टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथे मयताचा भाऊ रावसाहेब दत्तात्रय गायकवाड यांनी फिर्याद देवून आरोपी विरुध्द दिनांक २४ मार्च २०१७ रोजी भादविक ३६३, ३६४,३०२ अन्वये आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक बल्लाळ यांचेकडे तपास देण्यात आला. सदर गुन्हयाकामी पोलिसांनी तपास करुन आरोपीविरुध्द
दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले.
या सरकार पक्षाच्यावतीने सदर गुन्हा शाबितीसाठी १२ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेला मुख्य साक्षीदार आर्यन याची साक्ष महत्वाची ठरली कारण आर्यन व मयत या दोघांना एकाच गाडीवरुन मासे आणण्यासाठी घेवून गेला, सदर बाब साक्षीकामी अत्यंत
महत्वाची ठरली. कारण आरोपी व मयत हे दोघे एकत्रच होते ही बाब सरकार पक्षाने शाबित केली.

तसेच पुढे रसवंती गृहाचा मालक परशुराम देविदास नवले व बाळासाहेब देविदास नवले या दोघांनी आरोपीस मयतासोबत जाताना पाहिले होते व आर्यन यास आरोपीने या दोन्ही साक्षीदारांच्या रसवंतीगृहासमोर सोडले ही बाब न्यायालयासमोर आली. यातील आरोपीने गुन्हा केल्यानंतर
करमाळा पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर होवून गुन्हयाची कबुली दिली त्याबाबत आरोपीने दिलेल्या कबुलीची स्टेशन डायरीमध्ये नोंद केली या अनुषंगाने पोलीस निरीक्षक घोलप यांची साक्ष अत्यंत महत्वाची ठरली. यातील आरोपीने मयताचा गळा आवळून खून केलेबाबत
डॉ.मनिषकुमार पांडे यांनी दिलेली साक्ष तसेच डॉ.अंजली शेळके यांनी आरोपीला तपासल्यानंतर आरोपीच्या अंगावर नखाने ओरबडलेच्या खुना दिसून आल्या हे दोन्ही ही साक्षीदार सरकार पक्षाच्या केसला मदत करणारी ठरली. या प्रकरणी तपास अधिकारी यांनी घटनास्थळावरुन
आरोपीचे पॉकेट जप्त केले त्यामध्ये आरोपीचे ओळखपत्र, डायव्हिंग लायसेन्स व चप्पल आढळून
आले. सदर जप्ती पंचनामा सरकार पक्षाला सहायभूत ठरला. यातील तपास अधिकारी यांनी
केलेला तपास व मे कोर्टासमोरील पुरावा व सरकार पक्षाने दाखल केलेले मा.उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे व सरकार पक्ष व आरोपीच्या वतीने केलेल्या युक्तीवादाचा विचार करुन आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचे सरकार पक्षाने शाबित केले. त्यामुळे मे. जिल्हा व सत्र
न्यायाधीश श्री अ.ब.भस्मे यांनी आरोपीस भादविक ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व रु २०००/- दंड आणि दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद तसेच भादविक ३६३ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व रु १०००/- दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची साध
। कैद, भादविक ३६४ अन्वये १० वर्षाची शिक्षा व रु १०००/- दंड आणि दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली. सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश सुनावण्यात आले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह रजपूत, सहायक
सरकारी वकील प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले तर मुळ फिर्यादी तर्फे अॅड दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.