बार्शी – भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्याकडील गृहनिर्माण विकास महामंडळाचे सह अध्यक्षपद काढून घेण्यात आले आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढून या महामंडळाच्या पदांवर नव्याने नियुक्त्या करण्याचे जाहीर केले आहे. राज्यसरकारने यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला होता. त्यामुळे, राजेंद्र मिरगणे यांना 13, 03, 2012 च्या शासन अध्यादेशानुसार देण्यात आलेल्या सुविधा यापुढे त्यांना अनुज्ञेय राहणार नाहीत. त्यांचे पद काढून घेतल्यामुळे त्यांचा मंत्री पदाचा दर्जा ही काढला आहे.

राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य असलेल्या राजेंद्र मिरगणे यांची महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर, या महामंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्र्यांकडे होते. विशेष म्हणजे हे महामंडळ स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच ही नियुक्ती झाली होती. राजेंद्र मिरगणे हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील नेते म्हणून ओखळले जात होते.
मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर, या महामंडळावरील नियुक्या रद्द करण्याबाबत सातत्याने विचार सुरू होता. अखेर बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर आज शासनाने अध्यादेश काढून राजेंद्र मिरगणे यांचे पद काढून घेतले आहे. बार्शीकरांना हा एकप्रकारे धक्काच आहे. बार्शीचा हक्काचा माणूस राज्याच्या गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्षपद भूषवत होता. ते केवळ महामंडळाचे सह अध्यक्ष नव्हते तर त्याना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात राजेंद्र मिरगणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्फत हे पद टिकवण्यासाठी ही प्रयत्न केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्या गाठीभेटी ही घेतल्या होत्या. त्यामुळे त्यांचे पद टिकून राहील अशी शक्यता होती. मात्र तसे काही झाले नाही. सरकार बदलले की महामंडळा चे अध्यक्ष व पदाधिकारी ही बदलतात हे आजवर वेळोवेळी सरकारे बदलल्या नंतर दिसून आले आहे.या जागी सत्ताधारी पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना संधी देतात.
असे म्हटले आहे अध्यादेशात


प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्याच्या अनुषंगाने राज्यात घरकुलांच्या निर्मितीसाठी MHADA व्यतिरिक्त पूर्णवेळ कार्यरत राहू शकेल, अशा
“महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing)” ची स्थापना दि.११.१२.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. तसेच शासन निर्णय दि.१२.१२.२०१८ अन्वये श्री.राजेंद्र मिरगणे यांची सदर महामंडळाच्या सह अध्यक्ष पदावर नियुक्ती करुन शासन
निर्णय दि.१३.०८.२०१९ अन्वये त्यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
प्रत्येक प्रशासकीय विभागांतर्गत शासकीय/अशासकीय मंडळे व समित्या यावर नियुक्त केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करुन नव्याने मंडळे व समित्या पुनर्गठित करण्याचा
निर्णय मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र गृहनिर्माण विकासमहामंडळाच्या (MahaHousing) अशासकीय पदावर केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाच्या सह अध्यक्ष पदावरील श्री.राजेंद्र मिरगणे यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत आहे.
श्री.राजेंद्र मिरगणे यांची सह अध्यक्ष पदावर करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात आल्याने त्यांना दिलेला मंत्रीपदाचा दर्जाही यान्वये संपुष्टात येत आहे. त्यामुळे वित्त
विभागाच्या शासन निर्णय क्र.शासाऊ १०.१०/प्र.क्र.९६/१०/सा.ऊ, दि.१३.०३.२०१२ अन्वयेअनुज्ञेय केलेल्या सेवा सुविधा यापुढे त्यांना अनुज्ञेय राहणार नाहीत.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in यासंकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२००९०३१३२३२२६७०९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने उपसचिव रामचंद्र धनावडे यांनी काढला आहे.