रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यात आल्यानंतर राज्यातील काही भागांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.तसेच राज्यातील कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात १ ते ८ जुलै या काळात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता ३० जून नंतर राज्यातील लॉकडाउन उठविणार नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे राज्यातील लॉकडाउनमध्ये शिथीलता देण्यात आल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

काही ठिकाणी रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग कमी होताना दिसत नाही.तर काही जिल्ह्यांमध्ये करोनाने आणखी जोर पकडला आहे.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. येत्या १ ते ८ जुलै या काळात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले. वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी १ ते ८ जुलै या काळात रत्नागिरी जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.