लोणी काळभोर: ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शाळेत निघालेल्या दोन सख्या बहिणींचा मृत्यू
पुणे-सोलापूर मार्गावरील लोणी काळभोर येथे दोन सख्या बहिणी मामाच्या दुचाकीवरून आज सकाळी शाळेत निघाल्या होत्या, दरम्यान वाटेत त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोघींचाही मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील कवडीपाठ परिसरात राहणारे पांडुरंग नवनाथ भिक्षे हे त्यांच्या भाची गायत्री नंदकुमार शितोळे (वय-१७ ) आणि राजश्री नंदकुमार शितोळे (वय-१०) या दोघांनी आज(शनिवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील कन्या शाळेत सोडण्यास दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी लोणी काळभोर स्टेशन चौक येथे आल्यावर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली.
या धडकेत पांडुरंग नवनाथ भिक्षे हे रस्त्याच्या कडेला पडले. तर दोघी बहिणीच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक गाडीसह पसार झाला असून लोणी काळभोर पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.