पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश
पुणे : पुणे शहरात आणि जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन पुन्हा एकदा लॉकडाऊऩ घोषित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

लॉकडाऊनच्या केलेल्या घोषणेप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 15 दिवसांचे लॉकडाऊन असणार आहे. अजित पवारांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा परिसरातही पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल.
दरम्यान, पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आढावा बैठकीत मर्यादित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, सोशल डिस्टन्स पाळण्यावर कटाक्ष देण्यात आला होता.

प्रशासनाने वारंवार सूचना करूनही विनाकारण लोक रस्त्यांवर फिरत असल्याने अजित पवार यांनी हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. मागील बैठकीत रुग्ण आटोक्यात आणण्याचा आदेश पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला होता.

यावेळी पुणे शहराच्या शेजारी असलेल्या हवेली तालुक्यातही लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, हा लॉकडाऊन सोमवारी (दि.13) की मंगळवार (दि.14) पासून सुरु करायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार अजित पवार यांनी आयुक्तांना दिल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर या लॉकडाऊनमध्ये कोणत्या सेवा सुरू करायचा, कोणत्या बंद ठेवायच्या याचा निर्णयही दोन्ही महापालिका आयुक्त घेणार आहेत.

लॉकडाऊन कधी सुरु करायचा याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. सोमवारी मध्यरात्री नंतर लागू केला तर तो नागरिकांसाठी 14 तारखेपासून लागू होईल. मात्र 13 तारखेपासून लॉकडाऊन लागू केला तर तो सोमवारी सकाळपासून लागू होणार असा अर्थ होतो.
नागरिकांना काही वस्तू खरेदी करण्यासाठी, अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा निर्णय दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवला आहे.

पुणे शहरात कोरोनाचे 25 हजारांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. रोज 1 हजारांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर दररोज 4 हजार 500 च्या वर कोरोना चाचण्या होत आहेत