जयपूर: देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं होतं. कोरोनाच्या या संकटात राजस्थानच्या भिलवाडा येथील प्रशासनाने कोरोनामुक्त होण्यासाठी चांगली पाऊलं टाकली आणि त्यामुळे भिलवाडा मॉडलची चर्चाही झाली. मात्र, आता याच भिलवाडा येथे असं काही झालं की, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. कारण, एका लग्न समारोहामुळे १५ जणांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे.

६.२६ लाख रुपयांचा दंड
कोविड-१९ नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भिलवाडा जिल्हा प्रशासनाने एका व्यक्तीला ६ लाख २६ हजारांचा दंड ठोठावला आहे. या व्यक्तीवर आरोप आहे की, त्याने आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी निर्धारित संख्येपेक्षा अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले होते. या लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या १५ जणांना कोरोना झाला तर एका व्यक्तीचा मृत्यू सुद्धा झाल्याचं समोर आलं आहे.

लग्न सोहळ्यात ५० हून अधिक पाहुण्यांचा समावेश

राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात १३ जून रोजी विवाह सोहळा झाला होता. या विवाह सोहळ्यासाठी नवरदेवाच्या वडिलांनी निर्धारित संख्येपेक्षा अधिक म्हणजेच ५० हून अधिक पाहुण्यांना आमंत्रित केले होते. आपल्या मुलाच्या लग्नाच्या आनंदात त्यांनी कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केले. याचा परिणाम असा झाला की, लग्नात सहभागी झालेल्या १५ जणांना कोरोनाची लागण झाली. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी व्यक्तीवर ६ लाख २६ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सर्व १५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १२७ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. क्वारंटाईन सेंटरमधील खर्च आणि उपचाराचा खर्च अशा स्वरूपात राजस्थान सरकारने नवरदेवाच्या वडिलांना दंड ठोठावला आहे.
भिलवाडा जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या २४५ इतकी आहे तर मृतकांची संख्या ५ इतकी आहे. तर संपूर्ण राजस्थानमध्ये बाधितांची संख्या वाढून १७ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शनिवारी राजस्थानमध्ये २८४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील बाधितांची संख्या १६,९४४ इतकी आहे तर मृतकांची संख्या ३९१ इतकी आहे. राजस्थान आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,१८६ इतकी आहे.